मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेईन – आ. संतोष बांगर

0

हिंगोली;- 2024 मध्ये मोदी पंतप्रधान नाही झाले तर मी भरचौकात फाशी घेईन, अशी घोषणा कळमनुरीचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी केल्याने याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच  2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर होणार आहेत. तसे झाले नाही तर मी स्वतः भर चौकात फाशी घेणार, असे संतोष बांगर बुधवारी संध्याकाळी म्हणाले. त्यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यामध्ये, “जसं मी सकाळी सांगितलं होतं निकाल (आमदार अपात्रता) आमच्याच बाजूने लागेल, तसंच आताही तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, एप्रिलमध्ये होणाऱ्या आगामी २०२४ लोकसभा निवडणूकीमध्ये देशाचा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार. जर तसे झाले नाही तर हा संतोष बांगर भरचौकात जाऊन फाशी घेईन” असे ते म्म्हणाले.

यापूर्वी कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता न आल्यास मिशी कापेल, असे चॅलेंजच बांगर यांनी दिले होते. पण, निवडणुकीनंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली आणि बांगर यांची फजिती झाली होती. याशिवाय, काहीही झाले तरी मी शिंदे गटात जाणार नाही. मी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहीन. मी गद्दार नाहीय असे सांगताना ते मध्यंतरी ढसाढसा रडले होते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांतच ते शिंदेगटात गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलायला सुरुवात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.