नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात महिलेचा मृतदेह आढळला

0

नांदेड , लोकशाही न्यूज नेटवर्क

सुई धागा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अनोळखी महिलेचा नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नांदेड रेल्वे स्टेशनवर गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नांदेड रेल्वे स्थानकातून नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस (१७६१८) रेल्वे दररोज धावते. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास तपोवन एक्सप्रेस धर्माबादहून नांदेड रेल्वे स्टेशनवर दाखल झाली होती. गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाण्यासाठी ही रेल्वे प्लॅट फॉर्मवर उभी होती. त्यावेळी रेल्वेच्या डी-८ या कोचमधील शौचालयामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नांदेड रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश उनावणे यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता. तसेच तिच्या उजव्या गालावर खरचटलेही होते. तिच्या इतर अवयवांवरही जखमा असल्याचे पोलिसांना आढळले. मृत महिला 30 ते 35 वर्षे वयोगटातील आहे.
महिलेच्या शरीरावर जखमा आढळल्यामुळे हा प्रकार घातपाताचा असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मृत महिलेची ओळख पटली नाही. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. रेल्वेच्या शौचालयामध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने रेल्वे प्रवाशांत एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.