प. पू. नानामहाराज तराणेकर १२५ वी जयंती महोत्सवात रमले भक्तगण

0

इंदोर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

श्रीदत्त संप्रदायाचे थोर साक्षात्कारी संत सद्गुरु प. पू. नानामहाराज तराणेकर (Nana Maharaj Taranekar)  ह्यांचा १२५ वी जयंती महोत्सवाचा उद्घाटन समारंभ इंदोर नगरीत मोठ्या वैभव दिमाखाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkar) , कांचन नितीन गडकरी ह्यांचे हस्ते झाला.

 

त्रिपदी परिवाराचे प्रमुख, प.पू. नानांचे नातू, उत्तराधिकारी ज्ञानयोगी डॉ. बाबामहाराज तराणेकर आणि जया तराणेकर ह्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नितीन गडकरी ह्यांनी पूज्य नानांच्या आठवणींना उजाळा देत संतांनी आणि भारतीय वेदशास्त्र डॉ. परंपरेने जतन केलेल्या महान संस्कृतीचे महत्व विषद करीत यामुळेच संपूर्ण जगात भारताची प्रसन्न आगळी ओळख असल्याचे सांगितले. भारत केवळ याच सामर्थ्याच्या पायावर जगाचे नेतृत्व पुढील काळात सक्षमपणे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी पू नानांच्या जीवनावरील मराठी पू ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. नागपूरच्या शांतीपुरुष प्रतिष्ठानच्या कुशल नियोजनात हा समारंभ होत आहे. देश-परदेशातील विविध ठिकाणाहून आलेले सुमारे चार हजारावर भाविक सोहळ्यास उपस्थित आहेत.

१ ऑगस्ट रोजी सकाळी  डॉ. बाबामहाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभातीचे सूर संपूर्ण आसमंत सुगंधी आणि प्रसन्न करीत होते. पू नानांस अतिशय प्रिय असणाऱ्या अभंग रचनांचे उत्तम सादरीकरण संजय तराणेकर आणि सहकाऱ्यांनी केले. घोरातकष्टात स्तोत्र पठणाने, जागो मोहन प्यारे गीताने सुरुवात झालेली प्रभाती विविध मराठी, हिंदी अभंगांची मुक्त उधळण करीत होती. “गुरुजी मैं तो एक निरंजन” या गीताने सर्वांची वाहवा मिळविली. नानांचे सद्गुरु दत्तस्वरूप प.पू. वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज यांच्या भेटीलागी माझे मन उतावीळ” चे स्वर सर्वांना भक्तिरसात सुस्नात करते झाले. “जाग जाग प्रभो उशीर फार झाला” ह्या भैरवीने प्रभातीचा स्वरानंद समापित झाला.

पूज्य नानांना भजन अतिशय प्रिय असे. ते आपल्या खड्या आवाजात ज्यावेळी अभंग म्हणत त्यावेळी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा समोर उभा आहे  हीच अनुभूती घेत असत. कोणी सुस्वरात अभंग गायन केल्यास “तुम्ही आम्हाला ऋणी करून ठेवले आहे” अशी प्रशंसा ते करीत त्यावेळी प्रेमाश्रू दाटून येत. दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत आणि पूज्य नानांचा १२५ वा जयंती महोत्सव भक्तगणांच्या कायम स्मरणात राहणार आहे.

गुरु सेवेसाठी आपला जन्म ओवाळून टाकावा असेच पूज्य नानांचे जीवन ध्येय होते. पू. डॉ. बाबामहाराज तराणेकर याच सुपंथावर कार्यमग्र असून त्यांचे मार्गदर्शन आपणा सर्वांस उपकारक ठरणारे आहे.

गुरुसेवेच्या ह्या उच्च परंपरेस लक्ष लक्ष दंडवत !

Leave A Reply

Your email address will not be published.