तरवाडे येथील माय-लेकीच्या दुहेरी हत्याकांडाचा ३६ तासांत छडा

0

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

चारित्र्याच्या संशयावरून धुळे तालुक्यातील तरवाडे येथील मायलेकीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास करत अवघ्या ३६ तासाच्या आत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या वतीने या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे आपल्या पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईसह आजीच्या डोक्यावर घातक हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, धुळे मार्फत सुरु असतांना विविध संशयीतांना तपासले असता मयत वंदना महाले हिचे कुटुंबात कौटुंबिक कलह असल्याचे निदर्शनास आले. वंदनाच्या चारीत्र्याबाबत पती गुणवंत व मुले दिनेश व हितेश यांना संशय असल्याने त्यांच्यात वाद होत असे. मयत वंदना ही तीन महिन्यांपासून माहेरी तरवाडे येथे आई चंद्रभागासोबत राहत होती. वंदना महाले हिला पती गुणवंत महाले व मुलांनी सासरी येण्यासाठी मध्यस्थी मार्फतीने प्रयत्न केले होते. परंतु मयत चंद्रभागा ही मुलगी वंदना हिस पाठविण्यासाठी संमती देत नव्हती. या बाबी निदर्शनास घेऊन त्याआधारे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती प्राप्त झाली की, सदरचा गुन्हा मयत वंदनाचा लहान मुलगा हितेश गुणवंत महाले (वय १९, रा. आडगाव ता. एरंडोल जि. जळगाव) याने केल्याचा संशय बळावला.

हितेश महाले यास ताब्यात घेवून गुन्ह्याबाबत कसोशीने विचारपुस करता त्याने गुन्ह्याची कबुली देवून सांगितले की, आई वंदना हिच्या चारित्र्यामुळे व वर्तणुकीमुळे सारे कुटुंब त्रस्त झाले होते. यामुळे दि. २३ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आडगाव येथुन तरवाडे येथे मोटारसायकलने येवुन सोबत आणलेल्या लोखंडी पाईपने आजी चंद्रभागाबाई व आई वंदना हिचे डोक्यात वार करुन ठार मारल्याची कबुली दिली आहे. दरम्यान गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

मात्र आरोपीने गुन्ह्यात वापरलेला लोखंडी पाईप परत जातांना फेकल्याची कबुली दिली असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी हितेश गुणवंत महाले (वय १९, रा . आडगाव ता. एरंडोल जि. जळगाव) यास गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि प्रकाश पाटील, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, पोसई योगेश राउत, पोहेकॉ संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, रफीक पठाण, पोना योगेश चव्हाण, गौतम सपकाळे, राहुल सानप पोशि / कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, सुनिल पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.