स्नेहज्योत संस्थेच्या दिव्यांगांसह 126 बंधू-भगिनींना काश्मिर फाईल्सचे विनामूल्य दर्शन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई: भारत चेंबर ऑफ कॉमर्स चे विश्वस्त आणि ख्यातनाम उद्योगपती श्री. राजीव सिंघल यांनी कश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर आधारित विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट स्नेहज्योत या दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेला विनामूल्य दाखविण्याचे आश्वासन दिले होते.

त्याप्रमाणे हा चित्रपट सुमारे शंभर दिव्यांगांसह 126 लोकांना विनामूल्य दाखविण्यात आला. समाजातील सर्व स्तरातील व विशेषत: दिव्यांगांना देखील देशातील घडामोडींची व सत्य परिस्थितीची माहिती व्हावी या हेतूने हा चित्रपट दाखविण्याचे श्री. राजीव सिंघल यांनी अतिशय स्तुत्य कार्य केले असल्याचे स्नेहज्योत संस्थेच्या सुधाताई वाघ यांनी आवर्जून नमूद केले आणि श्री.

राजीव सिंघल यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  सोना थिएटर बोरीवली (पूर्व )येथे 100 दिव्यांग बंधू-भगिनी व 26 कार्यकर्ते यांना काश्मिर फाईल्स हा चित्रपट दाखविण्यात आला. स्वतः श्री. राजीव सिंघल हे यावेळी उपस्थित होते. दिव्यांग बंधू-भगिनींना घरातून निघाल्यापासून घरी परत जाईपर्यंतचा वेळ विचारात घेऊन त्यांनी अल्पोपहाराचेही नियोजन केले होते.

यामध्ये सोना थिएटरच्या मालकांचे व व्यवस्थापकांचे ही मोलाचे सहकार्य मिळाले. कस्तुरबा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले, असल्याचीही माहिती  स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान च्या महासचिव सुधाताई वाघ यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.