लोकशाही न्यूज नेटवर्क
रशियाची राजधानी मॉस्कोमधून भयानक घटना समोर आली आहे. एका कॉन्सर्ट हॉलमध्ये स्फोट आणि गोळीबार झालाय. मॉस्कोजवळील क्रोकस सिटी हॉलमध्ये तीन लोकांनी गोळीबार केल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
रशिया टुडेने काही मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत गोळीबाराच्या घटनेत 40 लोकांचा मृत्यू आणि 100 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. क्रोकस सिटी हॉलजवळ ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विशेष दलाचे जवानही क्रोकस सिटी हॉलमध्ये पोहोचले असून बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज अद्यापही ऐकू येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार सुरू झाल्यानंतर स्फोट झाला. TASS वृत्तसंस्थेनुसार, लोकांना येथून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, कॉन्सर्ट हॉलमध्ये लागलेल्या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओ फुटेजमध्ये लोकांचा जमाव हॉलमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. यामध्ये बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजही ऐकू येत आहे. एका व्हिडिओमध्ये हल्लेखोरही दिसत आहेत.
स्पुतनिक वृत्तसंस्थेनुसार, क्रोकस हॉलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या आधी मॉस्कोमधील अमेरिकन दूतावासाने संभाव्य हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. अमेरिकन दूतावासाने 7 मार्च रोजी त्यांच्या वेबसाइटवर एक निवेदन प्रसिद्ध केले होते. यात सांगण्यात आलं होतं की, ”मॉस्कोतील क्रोकस हॉलमध्ये अतिरेकी हल्ला करण्याची योजना आखात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. येथील अमेरिकन नागरिकांनी पुढील 48 तास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.”