महाराष्ट्राची उष्णतेच्या लाटेतून होणार सुटका; हवामान खात्याने दिला पावसाचा इशारा…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

सध्या महाराष्ट्रासह देशभरात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या प्रचंड उकाडा आहे. लोकांना उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळणार असल्याची बातमी आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भासह कोकण, मराठवाड्यातही पाऊस अपेक्षित आहे. याशिवाय इतर भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हवामानाचा अंदाज काय सांगतो?
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात पाऊस पडेल का?
गेल्या आठवड्यापासून विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत असतानाच विदर्भात आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. पुढील तीन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचे हाल झाले आहेत. अशा स्थितीत हवामान खात्यानेही महाराष्ट्रात मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात मान्सून वेळेवर दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.