आ. शिरीषदादा चौधरींची राजकारणातून निवृत्ती…!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यातील खिरोदा येथील चौधरी घराण्याला सेवा कार्याचा मोठा वारसा आहे. काँग्रेसमध्ये जिल्ह्यात असलेले एकमेव आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवशी राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली, आणि आपला वारस म्हणून त्यांच्या सुपुत्र धनंजय चौधरी यापुढे त्यांचा वारसा चालवतील असेही जाहीर केले. स्वातंत्र्यसेनाने धनाजी नाना चौधरी यांच्या नंतर लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी प्रदीर्घ काळ राजकारणाच्या माध्यमातून लोकांची पर्यायाने जिल्ह्याची आणि राज्याची सेवा केली. कै. मधुकरराव चौधरी यांच्या राजकीय कारकिर्दीत जळगाव जिल्ह्यात पायाभूत विकास झाला. तापी नदीवरील हातनूर हे धरण तसेच विविध धरणाच्या माध्यमातून सिंचन प्रकल्पाची निर्मिती, तापी नदीवर पुलाची निर्मिती, महामार्गाची निर्मिती, वरणगावची ऑडनस फॅक्टरी, भुसावळचे थर्मल पावर स्टेशन, सहकार क्षेत्रातील वसंत सहकारी साखर कारखाना, मधुकर सहकारी साखर कारखाना, भुसावळ येथील खडका सूतगिरणी, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा सुत गिरणी, आदीने जिल्ह्यातील सहकार क्षेत्र समृद्ध केले. शिक्षण मंत्री म्हणून राज्यातील शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल केला. त्यांनी शिक्षणावर काढलेली श्वेतपालिका गाजली. त्यानंतर विधानसभेचे सभापती म्हणून त्यांची पाच वर्षाची कारकीर्द लक्षवेधी ठरली. असा वारसा लाभलेल्या आमदार शिरीष चौधरींची राजकारणातील तिसरी पिढी २००९ ते २०१४ आणि २०१९ ते २०२४ असे दोन वेळा विधान सभेचे आमदार म्हणून आमदार शिरीष चौधरींनी चौधरी घराण्याच्या सेवा कार्याचा वारसा जपला. खिरोद्याचे जनता शिक्षण मंडळ, पाल येथील सातपुडा विकास मंडळाच्या माध्यमातून आदिवासींसाठींचे सेवा कार्य, तापी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ फैजपूर आणि जळगावला धनाजी नाना शिक्षण प्रबोधिनी संस्था या कै. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था आमदार शिरीषदादा चौधरी यांनी उत्कृष्टपणे चालू ठेवल्या. यावल रावेर तालुक्यात लोकप्रतिनिधी आमदार म्हणून रस्ते विकासाचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावल रावेर तालुक्याचा मोठा जनसंपर्क ठेवला. म्हणूनच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार म्हणून आमदार शिरीषदादा चौधरी १५ हजार पेक्षा जास्त मताधिक्क्याने विजयी झाले. आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घोषित केली असली, तरी त्यांचे वारस पुत्र धनंजयकडे आपला राजकारणाचा वारसा सोपवला आहे. सुपुत्र धनंजयला ते मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणार आहेत. धनंजयसाठी त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नंतरच्या चौथ्या पिढीचे नेतृत्व धनंजय चौधरी करणार आहे. धनंजय चौधरी गेल्या चार ते पाच वर्षापासून राजकारणात कुठल्या पदावर नसताना देखील वडील शिरीषदादा चौधरी यांच्यासोबत राहून राजकारणाचे धडे घेत आहेत. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नंतर धनंजय याने कायद्याची एलएलबीची पदवी प्राप्त केली. सेवाभाव हा धनंजयच्या रक्तात त्याचे आजोबा कै. मधुकरराव चौधरी यांच्याकडून बाळकडू स्वरूपातच मिळाले आहे. तरुणपणातच रावेर विधानसभा मतदारसंघात त्यांनी स्थापन केलेला जनसंपर्क वाखाणण्याजोगा आहे. समाजसेवा हा त्यांच्या रक्तातच भिनलेला आहे. गतवर्षी आमदार शिरीषदादा चौधरींच्या वाढदिवसानिमित्त रावेर यावल तालुक्यातील अपंगांचा सर्वे करून मतदार संघ संघात एकूण अपंगांची संख्या किती आहे, याचा आकडा काढून आमदार शिरीषदादांच्या वाढदिवशी अपंगांचा मेळावा घेऊन त्यापैकी अनेक अपंगांना तीन चाकी सायकलचे मोफत वाटप करून त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण केले. तसेच अपंगांच्या मेळाव्यात त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यातून कसे सहकार्य करता येईल, याचा प्रस्ताव तयार केला. सांगण्याचे तात्पर्य हे की, धनंजय हा पंचवीशीतील तरुण असताना मौजमजा करण्याचे दिवस असताना अपंगांची सेवा करण्याचा त्याचा मनात विचार येतो, म्हणजे ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, असेच म्हणावे लागेल. खिरोद्याच्या चौधरी परिवाराच्या सेवाभाव कार्याचा वारसा धनंजयला लाभला आहे. आजोबा कै. मधुकरराव चौधरी यांचा आदर्श घेऊन वडील आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळातील यात शंका घेण्याचे कारण नाही. धनंजय चौधरींच्या आगामी भावी वाटचालीसाठी दैनिक लोकशाहीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.