धक्कादायक; शिक्षकाने केला १५ ते २० विद्यार्थिनींचा विनयभंग

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी शाळेत १५ ते २० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीत संशयित शिक्षक दोषी आढळला. त्याच्यावर आदिवासी विभागाकडून निलंबनाची कारवाई केली आहे. या शिक्षकाने विद्यार्थी-गुरु यांच्या नात्याला काळिमा फसली असून, मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात शाळेच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षक आणि २ महिला शिक्षकांचे निलंबन करण्यात आले.

मुलींनी केली पालकांकडे तक्रार
नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी एकलव्य निवासी शाळेत विद्यार्थिनींशी अश्लील चाले करत असल्याच्या तक्रारी आल्या. हा शिक्षक विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. जवळपास १५ ते २० विद्यार्थिणींसोबत त्याने हा प्रकार अनेकदा केला. सुरुवातीला मुलींनी या प्रकाराकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर काही मुलींनी धाडस दाखवले. त्यांनी या प्रकारची तक्रार आपल्या पालकांकडे केली. त्यानंतर पालकांनी या प्रकरणी शाळेतील प्रशासनास जाब विचारला. शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.

चौकशीत धक्कादायक प्रकार उघड
पालक आणि विद्यार्थिनींकडून आलेल्या तक्रारीनंतर कळवण प्रकल्प कार्यालयाच्या विशाखा समितीने चौकशी सुरु केली. समितीकडून मुलींचे जबाब घेण्यात आले. जबाब देतांना मुलींनी संबंधित शिक्षकाने वारंवार अश्लील वर्तन केल्याचे सांगितले. शिक्षकाचे कारनामे उघड झाल्यानंतर विशाखा समितीने आपला अहवाल दिला. त्यांनी प्रकल्प कार्यालयाला हा अहवाल सादर केला. त्यानंतर आदिवासी विकास उपायुक्त विनीता सोनावणे यांनी कारवाई केली. या प्रकरणात संबंधित शिक्षक आणि २ महिला शिक्षकांचे निलंबन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.