संजय राऊतांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट; आ. संजय शिरसाट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) ईडीचे पथक (ED Team) रविवारी सकाळी सात वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांना समन्स बजावूनही ते चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याची माहिती मिळाली आहे.

आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार, त्यांना अटक होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या सर्व घडामोडींवर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

ईडीची कारवाई कायद्यानुसार 

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. शिरसाट म्हणाले की, “राऊत यांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट पडली. राऊत हे प्रवक्ता होते, मास लीडर नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईने मोठा क्षोभ उसळून येणार नाही. ईडीची कारवाई कायद्यानुसार होत आहे. राऊत निर्दोष असतील तर त्यांची सुटका होईल”.

अटक होण्याची शक्यता अधिक

तसेच “ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदारही आनंदी असतील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. “राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत:ची सुटका करून घ्यावी”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.

राऊतांनी बाळासाहेबांची शपथ घेऊ नये  

“संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये. बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार आम्हाला असून आम्ही पक्षासाठी 40 वर्ष काम केले आहे. नोकरी करता-करता नेते होणे सोपं नाही याची जाणीव आता राऊतांना होईल”,असे शिरसाट म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.