MBBS च्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; दोन डोसानंतरही संसर्ग

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यात तसेच मुंबईमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या मंदावत असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालय आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधील 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

हे सर्व 22 विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षातील आहेत. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. मागील दोन तीन दिवसांतच सर्वांना कोरोनाची लागण झाली. क्रीडास्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर येथील वसतीगृह शील केले जाण्याची शक्यता आहे.

बुधवारी मुंबईत 527 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, तर सहा कोरोना बाधित लोकांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांमुळे बाधितांची एकूण संख्या 7 लाख 42 हजार 538 झाली आहे. तर 405 रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 7 लाख 19 हजार 218 झाली आहे. सध्या मुंबईत 4 हजार 724 जण उपचार घेत आहेत.

तर ठाणे जिल्ह्यात बुधवारी 315 कोरोना रुग्ण आढळून आले. तर, तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 315 कोरोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली 96, ठाणे 76, नवी मुंबई 56, मीरा-भाईंदर 33, ठाणे ग्रामीण 21, बदलापूर 18, अंबरनाथ सात, उल्हासनगर सात आणि भिवंडीमध्ये एक रुग्ण आढळून आला. तर, तीन मृतांपैकी ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.