शिरसाड जि.प.प्राथमिक शाळेत आजी आजोबा दिवस साजरा

0

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  

येथून जवळच असलेल्या शिरसाड  येथील जि.प.प्राथमिक शाळेत आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिपालीताई सुभाष इंगळे या होत्या. कार्यक्रमास चाळीस पेक्षा जास्त आजी-आजोबा उपस्थित होते. सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित आजी आजोबा व लीडरमाता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक संदीप पितांबर बारी यांनी केले.

सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई-वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते. शाळा सोडून घरातला जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात. खरे पाहता आजी आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. आजी आजोबा पहिले मित्रच असतात. नात्याची तेव्हा तिथूनंच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्वपूर्ण असून हे नात पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी असते. शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्यांच्या जडण घडणीसाठी पोषक ठरतात. त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करणे यासाठी “आजी आजोबा” दिवस शाळेत साजरा करणे संस्कारपूर्णतेच्या दृष्टीने गरजेचे आहे.

मुलांना शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी “आजी आजोबा’ दिवस साजरा होणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी “आजी आजोबा” दिवस साजरा केला जातो. त्या अनुषंगाने या वर्षी १० सप्टेंबर, २०२३ रोजी “आजी आजोबा” दिवस होता.  त्याअनुषंगाने त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी अर्थात ११ सप्टेंबर रोजी हा दिवस विविध उपक्रम राबवून शाळेमध्ये साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम सर्व विद्याथ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून दिला. त्यानंतर आजी आजोबांचे नातवांच्या जडणघडणीतील महत्त्व याबाबत शाळेचे उपशिक्षक दीपक वसंतराव चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी काही आजींनी पारंपारिक गीतांचे  उत्फूर्त  गायन करून सर्वांचे लक्ष वेधले.  तद्नंतर आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची हा खेळ सुद्धा घेण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. यावेळीढ संगीत खुर्ची मध्ये रुखमाबई रामदास पाटील या आजी विजेत्या ठरल्या. त्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षक दीपक वसंतराव  चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रम आनंदी वातावरणात पार पाडून कार्यक्रमाचा उद्देश सफल व्हावं यासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक राजाराम मोरे, शिवदास महाजन, राजेंद्र महाजन, महेबुब शेख, सागर चौखंडे यांनी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.