मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केलीय. त्यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. या सभेतून त्यांनी थेट सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. मराठ्यांचे पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगी यांनी केली.
यावेळी जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावी, सरकारला खूप वेळ दिला. मुंबईत जाताना कुणी हिंसा करु नये. ३ कोटी मराठे मुंबईत येणार आहेत. जो हिंसा करेल तो आपला नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा.
मनोज जरांगे म्हणाले, कुणी गाडी पेटवली तर त्याला आपणच पकडून द्यायचं. कुणाला जाळपोळ करु द्यायची नाही. आम्हाला मुंबईला यायची हौस नाही पण आता आमच्या लेकरांना न्याय हवा आहे. २० तारखेच्या आत आरक्षण देता आलं तर बघा. मी मेलो तरी चालेल मागे फिरणार नाही. २० जानेवारीची तयारी शांततेत करा, मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली तर आरक्षण घेऊन मागे फिरणार, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.