मन की बात (दीपक कुलकर्णी)
महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक केवळ उमेदवारांचे भवितव्य ठरविणारी नाही तर अनेक पक्षांचे भवितव्य ठरविणारीही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट तसेच शिवसेनेचे दोन्ही गट यांच्यासाठी ही खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आली असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रावेर मिळाले आहे. जळगाव मतदारसंघात आजपर्यंत शिवसेनेला केवळ भाजपचा जयजयकार करावा लागला आहे; आता प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली आहे; तर रावेर मतदारसंघात भाजपला आव्हान देण्यासाठी व विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना शह देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील संधीचे सोने करण्याची वेळ आली आहे. महायुती व महाआघाडीचे जागावाटप जिल्ह्यात झाले असले तरी उर्वरित ठिकाणी त्यांचाही संघर्ष कायम आहे. उमेदवारी घोषित करण्यासाठी महाआघाडीने केलेला विलंब हा बंडखोरीला लगाम लावण्यासाठी असला तरी रावेरात राष्ट्रवादीमध्ये बंडखोरीचे संकेत मिळत आहे.
भाजप, सेना, राष्ट्रवादी यांची युती आणि काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी यांची आघाडी यावेळी मैदानात आहे. आता तर उमेदवार जाहीर झाले असून बऱ्यापैकी गाठीभेटी देखील वाढल्या आहेत. सध्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचे गुप्त खलबतांंना जोर येत आहे. कुणाला धडा शिकवावा यासाठी रणनिती देखील आखली जाईल, कुणाला तरी उणेदुणे काढण्यासाठी रसद येत राहील. त्यामुळेच यंदा निकालांचे अंदाज केवळ कागदांवरच्या बेरजा व वजाबाक्यांमधून मांडता येणार नाहीत.
भाजपने मावळत्या खासदारांपैकी उन्मेष पाटील यांना घरी पाठवले असून त्यांनी लागलीच आगपाखड करीत उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंध देखील बांधून घेतले आहे. आता तर उन्मेष पाटील हे भाजप नेत्यांनाच आव्हान देत फिरत आहेत. शिवसेना (उबाठा)ने करण पवार यांना उमेदवारी दिल्याने भाजप नेते सावध झालेले आहेत. रावेर मतदारसंघातही भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने खेळ खेळला असला तरी भाजपला साथ देण्यासाठी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे स्वगृही येत आहेत. राजकारणात केव्हा काय होईल याचा भरवसा राहिलेला नाही. श्रीराम पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीने तेथे उमेदवार दिला असला तरी संतोष चौधरी बंडाचा झेंडा हाती घेण्याच्या तयारीत आहेत. आघाड्या आणि युत्या घेऊन पळणारे ‘लोकनेते’ यांच्या या गोंधळाकडे मतदार सध्या शांतपणे पाहात आहे. यावर्षी मतदार राजाला सहा महिन्यांत दोनदा संधी मिळणार आहे. कुणाला धडा शिकवायचा हे त्याच्या हातात आहे. आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ, उणीदुणी आणि चिखलफेक यांना ऊत येईल. ‘आम्हाला तुमच्या या शिमग्यात रस नाही. महाराष्ट्राच्या हिताचे काय करणार, ते आम्हाला सांगा,’ असे यांना खडसावून सांगण्याची वेळ आली आहे. या वर्षीची निवडणूक खऱ्या अर्थाने अस्तित्वाची आहे. यात जनमतांचे अस्तित्व टिकविणे हेच खरे आव्हान आहे. हे आव्हान राजकीय पक्ष यांच्यासाठीच नाही तर मतदारांसाठीही काळजी करणारे आहे.