मकर संक्रांत व भोगीचे खास महत्व

0

लोकशाही विशेष लेख

भारतीय संस्कृती व परंपरा अतिशय समृद्ध आहेत. त्यात ऋतुचक्र वातावरणातील बदल आणि त्यायोगे होणारे शरीरावरचे बदल, त्या काळात येणारे अन्नधान्याचे महत्त्व हे सर्व विचारात घेतले आहे व त्यानुसारच सर्व सणवारांची निर्मिती केलेली आहे.‌ शिशिरॠतूची सुरुवात,मस्त गुलाबी थंडी, धुके अशात सूर्याचा धनु राशित केलेला प्रवेश यालाच धनुर्मास किंवा धुंधरमास असेही म्हणतात.

या थंडीच्या काळात आपला जाठराग्नी हा चांगला प्रदीप्त झालेला असतो त्यामुळे सकाळी लवकरच आपल्याला भूक लागते. अशावेळी या जाठराग्नीला हवनात योग्य समिधा द्याव्या लागतात म्हणजेच आपल्या पाचकाग्नीला तृप्त करणारे व शरीराचे योग्य पोषण करणारे पदार्थ या काळात खायचे असतात. या महिन्यात भाज्यांची रेलचेल असते. मटार, गाजर, वाल, पापडी, पावटा, वांगे, हरभरा, ज्वारीचा हुरडा, बोरे, ऊस इत्यादी अनेक पदार्थ उपलब्ध असतात म्हणून या ताज्या भाज्या वापरून केलेली जगातील पहिली मिक्स व्हेज भोगीची भाजी त्यात तीळ, शेंगदाणे, खोबरे हेही घातले जाते. त्याबरोबरच गरम गरम बाजरीची भाकरी तीही तीळ लावून तसेच घरचे ताजे लोणी साजूक तूप, मुगाची खिचडी, वांग्याचे भरीत, तीळ शेंगदाणे खोबऱ्याची चटणी असा खास बेत यापुढे पंचपक्वांनही फिके पडतील ही खाण्याची प्रथा आहे.

त्यामुळे शरीरास आवश्यक असणारी उष्णता व योग्य पोषणमूल्य मिळतात. सूर्योदयाच्या वेळी केलेल्या या भोजनाला अमृताची गोडी असते. सूर्योदयाच्या वेळी शेतात जाऊन हे भोजन केले जाते. त्यामुळे कोवळा सूर्यप्रकाश व प्रदूषण मुक्त हवा याचाही लाभ घेता येतो. भोगीच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते. संपूर्ण भारतात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. पंजाबमध्ये लोहरी, गुजरात राजस्थानमध्ये उत्तरायन, दक्षिण भारतात पोंगल तर आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून आपण हा सण साजरा करतो. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो संक्रमण होते म्हणून संक्रांत असं म्हटलं जातं. या काळात सूर्याची पूजा करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी विशेषतः हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे विटामिन डी हे फक्त सूर्यप्रकाशातूनच मिळते आणि या काळात ते जास्त प्रमाणात मिळते. सूर्यामुळेच या सृष्टीतील सर्व चलन वलन हे चालू असते. तसेच आरोग्यासाठी उत्तम असणारे सूर्यनमस्कार ही मोकळ्या हवेत कोवळ्या सूर्यप्रकाशात करावे. त्यामुळे भरपूर विटामिन डी आपल्याला मिळते. संक्रांतीला पतंग उडवण्याची प्रथा आहे त्यामागे ही हा कोवळा सूर्यप्रकाश मिळावा हाच उद्देश आहे.

संक्रांत हा सण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असला तरी प्रत्येक ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात ते म्हणजे तीळ आणि गूळ. तिळ हे गुणाने उष्ण व स्निग्ध असून त्यात अनेक पोषणमूल्य आहेत. या थंडीच्या काळात शरीराला आवश्यक असा उष्मा व सिद्धता यामुळे मिळते. तिळात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम व इतर मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात विटामिन ई असते. त्यामुळे ते हाडांच्या आरोग्यासाठी त्वचा, केस यासाठी अतिशय उत्तम आहे. ‌तीळ तेलाचे अभ्यंग व तिळाचे उटणे लावून अंघोळ या काळी करतात. ‌गुळामध्येही मोठ्या प्रमाणात लोह कॅल्शियम व इतर मिनरल्स असतात. त्यामुळे संक्रांतीला तिळगुळाचे लाडू वड्या पोळी खाल्ले जातात. यामुळे शरीरात वाढलेल्या वातदोषाचे शमन होते व शरीरातील रुक्षता दूर होते .स्त्रिया या काळात हळदीकुंकू समारंभ करतात. त्यामुळे त्या एकमेकींकडे नटून-थटून जातात, मनातल्या गोष्टी बोलतात, त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य व हार्मोनल संतुलन ही होत असते.

संक्रांतीला विशेषतः काळा रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेतो त्यामुळे विटामिन डी मिळण्यास त्याचा फायदा होतो‌. अशा रीतीने शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय उत्तम असा हा सण सगळ्यांनी पारंपारिक पद्धतीने साजरा करावा.

 

डॉ. लीना बोरुडे

आयुर्वेदाचार्य

फोन 9511805298

Leave A Reply

Your email address will not be published.