अहिंसात्मक सत्याग्रहाचे जनक : महात्मा गांधी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व्यक्तिमत्व म्हणून मोहनदास करमचंद गांधी यांना ओळखले जाते. केवळ भारत देशापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला सत्य (Truth), अहिंसा (Non- Violence), शांतीचा (Peace) महामार्ग त्यांनी आपल्या वर्तनातून दिलेला आहे. त्यामुळे भारत देशात २ ऑक्टोबरला ‘गांधी जयंती’ (Gandhi Jayanti) तर जगात ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ (International Day of Non-Violence) म्हणून साजरी करण्यात येते. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी १८६९ साली झाला. करमचंद व पुतळाबाई या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेले मोहनदास त्यांच्या तत्वामुळे, कार्यामुळे, कर्तृत्वामुळे, नेतृत्वामुळे आजही अजरामर आहेत. वयाच्या अगदी तेराव्या वर्षी कस्तुरबा यांच्याशी त्यांचा विवाह झाला तर वैवाहिक जीवनात त्यांना चार अपत्ये झाली आणि घरच्या व्यक्तीची ईच्छा बॅरिस्टर व्हावे अशी असल्याने त्यांना लंडनमध्ये जाऊन बॅरिस्टरची पदवी घ्यावी लागली पण सत्याचा कास धरणारे गांधींची कोर्टाच्या न्यायव्यवस्थेत अधिक काळ रमले नाहीत. अखेर त्यांनी वकिली सोडून दिली. ‘माझे सत्याचे प्रयोग’ या त्यांच्या आत्मचरित्रात परिपूर्ण जीवनचरित्र रेखाटले आहे.

जॉन रस्किन यांच्या ‘अनटू धिस लास्ट’ यांच्या पुस्तकातील विचारातून त्यांच्या जीवनात व वर्तनात आमूलाग्र बदल झाला. कुटुंबात मांसाहार वर्ज्य असल्याने शुद्ध शाकाहारी जेवण करीत असत. ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ चे पुरस्कर्ते होते. लंडन मध्ये बॅरिस्टरची पदवी संपादन केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत एका कंपनीत नोकरी मिळाली तेव्हा रेल्वेने प्रवास करीत असतांना काळे-गोरे या भेदभावावरून रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना डब्यातून हाकलून लावले. ती रात्र नि तो दिवस त्यामुळे भेदभावाची, अन्यायाची पाळेमुळे खोदून काढून व्यवस्थाच बदलण्याची क्लृप्ती, लढा उभारण्यात यशस्वी होऊ लागले. दक्षिण आफ्रिकेत भारतीय लोकांवर होत असलेला अन्याय बघून मन सुन्न होत होते. अशातच आफ्रिकेत भारतीय लोकांना मतदानाचा अधिकार नाकारण्याचा कायदा होऊ लागला होता. त्या विरोधात भारतीयांना एकत्र आणून ‘नाताळ भारतीय कांग्रेस’ ही संघटना स्थापन करून विविध अन्यायकारक कायद्याचा त्यांनी विरोध केला. वयाची २१ वर्ष दक्षिण आफ्रिकेत राहिले. महात्मा गांधी यांचे एक तत्व होते की, सुड भावनेने कोणाला शिक्षा करविणे हा त्यांचा मुख्य हेतू नव्हता तर अन्याय, अत्याचारकारक व्यवस्था बदलविण्यासाठी त्यावर शांततापूर्वक घाव घालणे तसेच आफ्रिकेत असलेले वंशभेद, असमानता या मुद्यावर त्यांनी अधिक भर दिला.

दक्षिण आफ्रिकेतून १९१५ साली भारतात परतल्यावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सानिध्यात राजकीय चळवळीची माहिती जाणून घेतली. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू म्हणून गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे बघितले जाते. भारतीय स्वातंत्र्य लढा उभारलेला असतांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हीच एकमेव राजकीय संघटना अस्तित्वात होती. ब्रिटिश अधिकारी भारतीयांवर अमानुष छळ करीत असे. बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांना फक्त निळ या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी जबरदस्ती करीत असत व झालेला पीक त्यांना द्यावे लागे त्यामुळे गरीब शेतकरी आणखी गरीब होऊ लागली. रामकुमार शुक्ला यांनी ही गोष्ट गांधीजींच्या कानावर घातली आणि लढा यशस्वी करून दाखविला त्यानंतर खेडा सत्याग्रह, गिरणी कामगार अश्या असंख्य लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधी करू लागले. मुस्लिम लोकांमध्ये होत असलेली व खिलाफत चळवळ कमकुवत होत असतांना महात्मा गांधींनी त्यांना बळकटी दिली. कोणताही भेदभाव न करता गरिबी निर्मूलन,आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे मूलभूत हक्क, सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता निर्मूलन यासारखे यासारख्या सामाजिक सुधारणा लागू करण्यासाठी उपोषण, सत्याग्रह हे अहिंसात्मक मार्गाने लढा देऊन सोडविण्यात यशस्वी होऊ लागले.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर स्वातंत्र्य लढ्यासाठी नेतृत्व उभे करणारे ‘गांधी पर्व’ सुरू झाले.जालियनवाला बाग हत्याकांड, विनाचौकशी अटक करणारा ‘रौलेट ऍक्ट’ याचा त्यांनी विरोध केला. ब्रिटिशांना कोणतेही सहकार्य करायचे नाही तेव्हा ‘असहकार आंदोलन’ त्यांनी सुरू केले पण उत्तरप्रदेश मधील चौरीचौरा येथील हिंसक घटनेने गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होत असलेली दुफळी एकत्र करण्यासाठी मध्यस्ती म्हणून देखील कार्य केले. भारत देशाला स्वराज्य मिळविणे हे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच स्वदेशी वस्तूचा वापर करण्याची सक्ती करू लागले. इंग्रज अधिकारी सुधारणा करण्यासाठी सायमन कमिशन, गोलमेज परिषद यासारख्या सभा झाल्या तरी स्वातंत्र्याची मागणी करीत नव्हते म्हणून १९२९ साली लाहोर अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज्याचा ठराव’ पारित करण्यात आला. मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, सविनय कायदेभंग या अस्त्राचा वापर करून स्वातंत्र्य चळवळ अधिक गतिमान करण्यात महात्मा गांधीजी यशस्वी ठरले.

स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गांधीजींचे असलेले योगदान त्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांनी ‘महात्मा’ या पदविणे त्यांना गौरविण्यात आले तर लोकांच्या आपुलकीने ‘बापू’ या नावाने देखील संबोधल्या जात होते. सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यात स्वातंत्र्य लढ्याबाबत वैचारिक मतभेद निर्माण झाले. ‘स्वातंत्र्य मिळविण्यासाठी वेळप्रसंगी हिंसक वृत्ती करावी लागली तरी चालेल पण स्वातंत्र्य मिळवू’ अशी सुभाषबाबूची इच्छा होती पण महात्मा गांधी यांना मान्य नव्हते त्यामुळे सुभाषबाबूने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दुसरे महायुद्ध सुरू असतांना १९४२ साली भारत छोडो आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यात ‘करो या मरो’ या मूलमंत्राचा वापर भारतीय जनतेला देण्यात आला. याची कुणकुण इंग्रजांना लागली तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची शिर्षस्थ नेत्यांना इंग्रजांनी आगाखान पॅलेस मध्ये डांबले. महात्मा गांधींना देखील तिथेच ठेवण्यात आले त्यात त्यांचे खाजगी सचिव व पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांची प्रकृती खालावली व त्यांना देखील तुरूंगातून सोडून देण्यात आले.

हुजूर पक्षाचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी महात्मा गांधी यांना ‘अर्धनग्न फकीर’ म्हणून त्यांची निंदा केली गेली. हिंदू धर्मातून अस्पृश्य जनता बाहेर पडू नये यासाठी सर्व धर्मातील जनतेला एकत्र बांधून ठेवण्याची नेतृत्वकला त्यांच्यात ठासून भरलेली होती. महात्मा गांधी यांनी दलितांना हरिजन (देवाची माणसे) तर आदिवासींना ‘गिरीजन’ या नावाने संबोधत असत. दुसरे महायुद्ध सुरू असतांना सुभाषचंद्र बोस यांनी क्रांतिकारकांचा मार्ग अवलंबला तेव्हा महात्मा गांधी यांचा उल्लेख त्यांनी ‘राष्ट्रपिता’ असा केला आहे. महात्मा गांधी यांना अभिप्रेत नसतांना देखील अखंड भारताचे होत असलेले तुकडे त्यांच्या मनाला वेदना होत होत्या. मुस्लिम जनतेला पाकिस्तान राज्य हवे होते त्यामुळे फाळणी दरम्यान होत असलेले दंगे शमविण्यासाठी मध्यस्थी करीत होते. कोणतीही समस्या, वाटाघाटी करण्यासाठी उपोषण हेच अस्त्र त्यांनी वापरले त्यामुळे आत्मशुद्धी व राजकीय चळवळ वाढीसाठी याचा वापर होत असे. महाराष्ट्रातील वर्धा, सेवाग्राम याठिकाणी १९३६ पासून वास्तव्य होते तर त्याठिकाणी अजूनही ते आश्रम अस्तित्वात आहे. त्यांच्या खाणाखुणा व त्यांचे विचार जगात पसरवण्यासाठी गांधीविचार धारा जिवंत असल्याची चिन्हे दिसून येते. आपले विचार जन माणसात पोहचविण्यासाठी इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन यासारख्या वृत्तपत्रातून विचार पेरत असत. महात्मा गांधी यांचे संपूर्ण जीवन सत्य,अहिंसात्मक आंदोलनाने प्रेरित असल्याने ‘अहिंसात्मक सत्याग्रहाचे जनक’ म्हटल्यास वावगे वाटणार नाहीच..

✒️ दुशांत बाबुराव निमकर
शब्दांकूर फाउंडेशन,चंद्रपूर
मो. नं. ९८३४२३६८२४

Leave A Reply

Your email address will not be published.