राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारलीय. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पावसाने पुनरागमन केले आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत जात आहे. रविवारी उत्तर बंगालच्या उपसागरात वार्‍याची चक्रिय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणीच पुढील 24 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 4 सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्याच्या अनेक भागांमध्ये शनिवारी जोरदार पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते मध्यम पाऊस झाला. पुढील पाच दिवस राज्यात सर्वत्र जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती.

तसेच संपूर्ण राज्यात तुरळक, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. 4 तारखेला मध्य महाराष्ट्रात, 4 आणि 5 तारखेला मराठवाड्यात, 5 आणि 6 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.