महारेलतर्फे नवनिर्मित उड्डाणपुलांचे उद्घाटन व भूमिपूजन

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महारेलने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये १५ उड्डाणपूलांचे बांधकाम पूर्ण करून ते कार्यान्वित केलेले असून आता महारेल सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात आणखी नऊ उड्डाणपूलांचे कार्यान्वित करीत आहे. या नवनिर्मित नऊ उड्डाणपूलांचे उद्घाटन आणि नागपूर शहरातील पाच नवीन उड्डाणपुलांचे भूमिपूजन समारंभ शनिवार १७ डिसेंबर २०२३ रोजी के. डी. के. कॉलेज चौक, व्यंकटेश नगर, गोरा कुंभार स्वेअर, नंदनवन, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता.

या उड्डाणपुलांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्राच्या संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, राज्यसभा व लोकसभा सदस्य,  विधान परिषद सदस्य आणि विधानसभेचे सदस्य यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर महानगरपालिका इ. प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल हे देखील यावेळी उपस्थित होते.

या समारंभाच्या प्रसंगी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल म्हणाले, “हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे कारण आज आम्ही राज्यभरात आणखी नऊ उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नागपूर शहरात नवीन पाच उड्डाणपुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन करत आहोत. महारेलने २०२३ मध्ये २४ उड्डाणपूल कार्यान्वित करून महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोठा वाटा उचलला आहे. पुढील वर्षात आणखी उड्डाणपूल सुरू करण्याचा महारेलचा संकल्प आहे. मी विशेष करून माननीय विधानसभा सदस्य कृष्णा खोपडे यांचे आभार मानू इच्छितो कारण महारेलमार्फत नागपुर शहरात बांधण्यात येणाऱ्या या पाच उड्डाणपुलांच्या जलद मंजुरीसाठी अविरत प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे.

मुख्य बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाने नागपूर शहरातील ५ उड्डाणपुल बांधण्यासाठी महारेलला १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली आणि केवळ २ महिन्यांच्या कालावधीत महारेलने सर्वेक्षण, डिझाइन, रेखाचित्र पूर्ण केले. एवढेच नव्हे तर साइटवर मोबिलायझेशन आणि भौतिक कामे सुरुवात करण्यास महारेल तयार आहे हे महारेल साठी एक मोठे यश आहे.

महारेल राज्यभरात उड्डाणपुलांचे व केबल स्टेड ब्रिज इ. बांधकाम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पांना रेल्वे मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका अशा विविध प्राधिकरणांकडून निधी दिला जात आहे.

मुंबईतील सर्वात गजबजलेल्या शहरात, जीर्ण झालेल्या १०० वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन पुलांची पुनर्बाधणी करण्याचे सर्वात कठीण काम महारेलकडे सोपविण्यात आले आहे. महारेलने दादर येथिल टिळक ब्रिज, रे रोड ब्रिज, भायखळा ब्रिज आणि घाटकोपर ब्रिज च्या जागी रहदारीला कोणताही अडथळा न आणता ब्रिजची योजना आखली आहे. याव्यतिरिक्त, एमएमआरडीए आणि केडीएमसी द्वारे प्रभादेवी ब्रिज, शिवडी ब्रिज आणि टिटवाळा ब्रिज च्या बांधकामाची जबाबदारी सोपवली आहे. या पुलांमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल, त्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय आणि त्रास सहन करावा लागणार नाही. विविध महामंडळांनी प्रकल्प मंजूर करून दाखविलेल्या विश्वासाबद्दल महारेल कृतज्ञ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.