पद्मश्री कविवर्य ना.धो. महानोर अनंतात विलीन

0

जळगाव ;- पद्मश्री कविवर्य ना.धो. महानोर यांना आज शुक्रवारी  सायंकाळी साश्रु नयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. पळसखेड या मुळ गावी सायंकाळी ‘सुलोचना बाग’ या महानोरांच्या शेतात त्यांचे धाकटे चिरंजीव डॉ. बाळकृष्ण महानोर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

याप्रसंगी अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी गोवऱ्या आणि चंदनाच्या फुलांचे हार यांचा उपयोग करण्यात आला. तीन वेळा हवेत फैरी झाडण्यात आल्या. त्यानंतर सायंकाळी ५.१० वाजता कवी महानोर यांच्या पार्थिवावर अग्निडाग देण्यात आला.

रात्री त्यांचे पार्थिव पळसखेडा येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. सकाळपासून अंत्यदर्शनासाठी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली होती. शेतातील सुलोचना बागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिव सरणावर ठेवण्यापूर्वी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महानोर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ‘पीक करपलं, पक्षी दूर देशी गेलं, गाळणाऱ्या झाडांसाठी मन ओथंबलं’ या महानोर यांच्या कवितेचे गायन सुदीपा सरकार यांनी केले. नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, सिल्लोडचे तहसीलदार रमेश जसवंत, सोयगावचे तहसीलदार मोहन हरणे यांनी आदरांजली वाहिली.
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, अविनाश जैन, दादा नेवे, राजा मयूर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर या मान्यवरांसह साहित्य क्षेत्रात कौतिकराव ठाले पाटील, रंगनाथ पठारे, दादा गोरे, श्रीकांत देशमुख, प्रा. ऋषिकेश कांबळे, अजीम नवाज राही, दासू वैद्य, चंद्रकांत पाटील, प्रतिभा शिंदे, अशोक कोतवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

.

महानोर हे महाकवी आणि रानकवी होते. त्यांच्या शब्दांचाच रंग हिरवा होता. मोठ्या मनाच्या या माणसाने  पुन्हा परतून यावे, अशी भावना अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त केल्या.  श्रीकांत देशमुख यांनी म्हटले की, महानोर हे अजिंठा लेण्यांप्रमाणे एक लेणं होते. गाण्याचा चेहरा बदलणारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलेच कवी होते.  रंगनाथ पठारे म्हणाले की, ‘महानोरांनी साहित्याला श्रीमंत केले. आणि त्यांचे देणं कधीही संपणार नाही.’  अंत्यसंस्कार सुरु असतांना ‘पीक करपलं, पक्षी दुर देशी गेला’ हे गीत वाजवण्यात येत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.