रानकवी ना. धों. महानोरांना लोकशाहीतर्फे अखेरचा सलाम

0

 

विशेष संपादकीय

 

सुप्रसिद्ध रानकवी खानदेश भूषण ना. धों. महानोर यांची गुरुवारी वयाच्या ८१ व्या वर्षी प्रदीर्घ आजारानंतर पुण्यात प्राणज्योत मालवली. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या जन्म गावी पळासखेडा येथे हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. एका खेड्यात निरक्षर शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों. महानोरांनी आपल्या लेखणीने साऱ्यांना भुरळ पाडली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांनी या खेड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये असलेली प्रतिभा हरली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांना आमदार करून महानोरांमध्ये असलेल्या शेती संदर्भात ज्ञानाचा फायदा महाराष्ट्राला मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ‘.पाणी आडवा पाणी जिरवा’ ही महानोर यांची संकल्पना शेतीसाठी किती उपयुक्त आहे हे सिद्ध झालं. त्यामुळेच दोन वेळा त्यांना आमदारकी देण्यात आली. आमदार म्हणून राजकारणात कवी महानोर बारा वर्षे वावरले असले तरी, राजकारणाचा एकही गुण त्यांना लागला नाही. किंवा अशा राजकारणात असूनही ते राजकारणापासून चार हात दूरच राहिले. राजकारणात गेलेल्या व्यक्तीची प्रतिमा डागाळते असा असलेला समज महानोरांनी मोडून काढला. राजकारणाचा उपयोग समाजकारण करण्यासाठी अथवा समाजसेवेसाठी किती चांगला प्रकारे करता येतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘.कै. ना. धों. महानोर’ हे होय. राजकारणात राहून समाजसेवेचे व्रत त्यांनी बाळगले होते. राजकारणात जरी बारा वर्षे कवी महानोर यांनी घालवली असली तरी, उत्तम साहित्य निर्मिती करण्यापासून ते कधीही दूर गेले नाहीत. उत्तम कविता निर्मितीचा त्यांचा ध्यास तसूभरही कमी झालेला नव्हता. १९५८ साली त्यांना ‘गीतकार जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर भारत सरकार तर्फे त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात आले. आंबोली, एक होता विदूषक, जैत रे जैत या सिनेमासाठी त्यांनी गीतांची रचना केली. ती गीते रसिकांना विशेष भावली. त्यांच्या कवितांना कित्येक पुरस्कार मिळाले. त्यांचे गद्य काव्य सुद्धा गाजले आणि त्यांची दखल साहित्य रसिकांनी घेतली. ‘ऐसी कळवळ्यांची जाती’ या त्यांच्या पुस्तकात महानोर यांच्या जीवनात असलेल्या व्यक्तींचा त्यांच्यावर झालेल्या प्रभावा संबंधित विषय लिहिलेला आहे. त्यात जळगाव येथील प्रसिद्ध जैन उद्योग समूहाचे संस्थापक उद्योगपती कै. भवरलालजी जैन यांचे सुद्धा एक प्रकरण आहे. त्यात कै. भवरलाल भाऊंनी महानोर यांच्यावर निर्भेद असे प्रेम केले. महानोर यांच्यातला कवी साहित्यिक जपण्यासाठी कै. भाऊंनी फार मोठा आधार दिला. त्यांच्यामुळेच सर्व दृष्टीने मी उभा राहू शकलो, ही कृतज्ञता महानोर यांनी व्यक्त केली आहे. शेवटपर्यंत त्या दोघांच्या मैत्रीत खंड पडला नाही असे भाऊंविषयी आदरपूर्वक लिहिले आहे.

 

कवी ना. धो. महानोर यांचे जन्मगाव मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील असले तरी जळगावशी आणि खानदेशी त्यांचे विशेष नाते जोडले गेले होते. त्यामुळे महानोर हे जन्माने मराठवाड्याचे म्हणून मराठवाड्याला अभिमान होता, तद्वत कवी महानोर यांचे वास्तव्य आणि नाते खानदेश बरोबर जुळले असल्याने खानदेशवासीयांनाही कवी महानोर यांच्या विषयी विशेष अभिमान होता. खानदेशचे भूषण म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. पळासखेडे सारख्या खेड्यात राहून उत्तम शेती करता करता उत्तम साहित्याची निर्मिती महानोर यांनी केली. त्यातून त्यांचे वेगळेपण लक्षात येते. त्यांच्या पळसखेडे गावातील आपल्या शेतातच त्यांनी वास्तव्य केले होते. त्यांची उत्तम शेती पाहण्यासाठी तसेच महानोरंबरोबर गप्पा गोष्टी करण्यासाठी अनेक नामवंत साहित्यिकांनी पळसखेडे गावात अनेक वेळा भेटी दिल्या आहेत. पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या अनेक दिग्गजांचा त्यात समावेश आहे. निसर्गरम्य पळसखेडे सर्व भेटी देणाऱ्यांना भावले होते. महानोर यांनी पळसखेडे येथे सीताफळाची उत्तम शेती केली. सीताफळाला त्यांनी ‘लताफळ’ असे लतादीदींचे नाव देऊन सिताफळ खाणाऱ्यांमध्ये एक उत्सुकता निर्माण केली. शहरातील लोकांना खेड्याविषयी प्रेम निर्माण करणारे कवी महानोर आज आपल्यातून पारखे झाले आहेत. निसर्गावर मनापासून प्रेम करणाऱ्या या कवीने पळासखेडे येथे निसर्गच निर्माण केला आहे. साहित्यिक म्हणून महाराष्ट्राची मान्यता त्यांना मिळाली होती. त्यांनी ग्रामीण भागातील अनेक कवी घडवले आहेत. त्या कवींना त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. अशा या साहित्यिकाला मराठी साहित्य क्षेत्रातील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदापासून मात्र वंचित रहावे लागले, ही एक खंत त्यांच्या रसिकाच्या हत्यांमध्ये कायम राहील. परंतु कै. ना. धों. महानोर म्हणायचे, “मी त्यासाठी निवडणूक लढणार नाही.” निवडणूक पद्धतीतील वाईट प्रथांना त्यांचा निषेध होता. त्यामुळे ते जरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नसले तरी व्यक्तीच्या त्यांना त्यांची खंत वाटत नव्हती. लाखो साहित्य रसिकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम हीच त्यांची शिदोरी आहे, असे ते म्हणायचे. असा रानकवी आज अनंतात विलीन झाला. त्यांच्या पत्नी सुलोचना ताई यांचे निधन होऊन दोन वर्षे देखील पूर्ण होत नाही तोपर्यंत कवी महानोर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पत्नी सुलोचना ताईंच्या निधनानंतर मात्र महानोर खऱ्या अर्थाने एकटे पडले होते. अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना दै. लोकशाही परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि अखेरचा सलाम…!

Leave A Reply

Your email address will not be published.