महागाईच्या ठसक्याने गरीब रडकुंडीला

0

 रजनीकांत पाटील, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज सर्वसामान्य आणि हातावर पोट भरणारे गोर- गरीब कुटुंब महागाईच्या ठसक्याने रडकुंडीला आले आहेत. महागाईमुळे जनता हतबल झाली आहे. एकीकडे उन्हाचे चटके बसत असताना दुसरीकडे नागरिक महागाईच्या वरवंट्याखाली भरडले जात आहेत. करोना महामारीमुळे पदरमोड करून वाचविलेला  पैसा खर्च झाला तर दुसरीकडे हातच्या नोकऱ्या गेल्याने आणि कामच मिळेनासे झाल्याने गरीब जनता हतबल झाली. त्यातच महागाई कमी करण्याचा दावा करणाऱ्या मायबाप सरकाने महागाईच्या मुद्यावर हात वर केल्याने वाढलेल्या महागाईने सामान्यांचे जगणेच नव्हे तर  मरणंही कठीण झाले आहे.

कमाई एक खर्च अनेक ताळमेळच बसेना !

गेल्या सहा महिन्यात महागाईने उच्चांक गाठला आहे. वाढलेल्या महागाईमुळे महिना अखेरपर्यंत उत्पन्न आणि खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी सामान्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अन्न, वस्त्र,निवारा या मूलभूत गरजा भागविताना बजेट बिघडले आहे. परिणामी नागरिकांची बचत वस्तू खरेदीसाठी खर्च होऊ लागली आहे. परिणामी अनेकांनी खरेदीपासून थोड्या फार प्रमाणात हात आखडता घेतला आहे. वस्तूंच्या विक्रीत घट झालेली आहे. चूल पेटविण्याची वेळ महागाईचा वणवा पेटला असताना रशिया-युक्रेन युद्धाने त्यात तेल ओतले गेले. अन् छोट्या व्यापारांपासून पगारदारारांपर्यंत प्रत्येकाची होरपळ वाढली.

सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले 

पेट्रोल, डिझेल, गॅस महागल्यानंतर सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. उन्हाळ्यात मसाल्यासाठीच्या मिरचीच्या भावात यंदा विक्रमी वाढ झालेली आहे. १२० रुपये किलो मिळणारी मिरची यंदा २५० ते २६० रुपये किलो झालेली आहे. तांदूळ, गव्हासह बहुतांश सर्व अन्न पदार्थांच्या दरात वाढ झाली. त्यामुळे रोजचा उदरनिर्वाह करणेही अवघड झालेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.