वेळ पडल्यास देशाची राज्यघटनाच बदलू

जानकरांच्या वक्तव्यावर आंबेडकरी संघटनांकडून निषेध

0

परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

दोन दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटना बदलून टाकू असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी संघटनांकडून याचा निषेध नोंदवण्यात आला. आंबेडकरी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंबेडकर पुतळ्याजवळ जानकर यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली.

महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे शहरांमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत होते. त्यावेळेस एका वृत्तवाहिन्यच्या प्रतिनिधीशी ते संवाद साधत होते. त्याचवेळी एक मराठा तरुण त्या ठिकाणी आला आणि त्यांनी जानकरांना मराठा आरक्षणाविषयी विचारले. जानकर यांनी त्या युवकाला मराठा आरक्षण देण्यासंबंधी माझी भूमिका ठाम आहे. मराठा समाजाला सध्या जे दहा टक्के आरक्षण मिळाले आहे, त्यासाठी देखील मी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले.

पण तरुणाने हे दहा टक्के आरक्षण टिकणार नाही. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि यासाठी तुम्ही प्रयत्न करा असेही तो जानकरांना म्हणाला. त्यावर जानकरांनी त्या तरुणाला शांत करत मराठा आरक्षणासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असे सांगितले. आता मी खासदार होऊन दिल्लीला जाणार आहे. पंतप्रधान मोदींना मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यास भाग पाडेल असेही ते म्हणाले. वेळप्रसंगी राज्यघटनेत बदल करावा लागला, तरी आपण बदल करू पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, की संविधान बदलू म्हणून जाणीवपूर्वक हे वक्तव्य करून जाणकारांनी मनुवादी विचारसरणीचा परिचय दिला आहे ही बाब संविधान प्रेमी कदापि खपवून घेणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर भदंत मोदीतानंद, नागेश सोनपसारे, आशिष वाकोडे, अर्जुन पंडित, संजय सारणीकर यांचे हस्ताक्षर आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.