शिवमहापुराण कथा: दररोज 200 जादा बसगाड्यांचे नियोजन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगावपासून काही अंतरावर असलेल्या वडनगरी फाटा भागात ५ ते ११ डिसेंबरदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे कथेच्या सर्व दिवस दररोज २०० जादा बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना कथेच्या ठिकाणी पोचणे सोयीचे होणार आहे.

विभाग नियंत्रक भगवान जगणोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडनगरी फाटा (ता. जळगाव) येथील असलेल्या बडा जटाधारी महादेव मंदिर येथे श्री शिवमहापुराण कथा होत आहे. कथेसाठी जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे. ही गर्दी लक्षात घेता महामंडळ विविध बसस्थानकातून बसगाड्या थेट श्री शिवमहापुराण कथेच्या वाहनतळापर्यंत सोडणार आहे. बसगाड्या सकाळपासून सायंकाळपर्यंत सोडण्यात येणार आहे.

महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे विविध बसस्थानकातून जादा बसगाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन श्री शिवमहापुराण कथेसाठी करण्यात आले आहे. त्यात जळगावसह यावल व चोपडा आगारातील बसगाड्या असतील. जळगाव बसस्थानकातून दररोज १०० तर यावल व चोपडा आगारातून एकूण १०० बसगाड्या सोडण्यात येतील.

कथेच्या स्थळी विविध मार्गावरून येणाऱ्या वाहनांना तीन ठिकाणी वाहनतळ तयार करण्यात आले आहेत. चोपडा, अमळनेर, चाळीसगावकडून येणाऱ्या वाहनांना वेगळे वाहनतळ, तर भुसावळ, यावल, मुक्ताईनगर, रावेरकडून येणाऱ्या वाहनांना वेगळे वाहनतळ आहे. याठिकाणी एसटी महामंडळातर्फे तात्पुरते नियंत्रण कक्ष तयार करून भाविकांना एसटी बसगाड्यांची माहिती दिली जाणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.