संतापजनक : रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक

बाथरूममध्ये कोंडून..

0

लोणावळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कॉलेजमध्ये अनेक जण रॅगिंगला बळी पडत असतात. यामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. असाच रॅगिंगचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात घडला आहे. लोणावळ्यातील एका नामांकित महाविद्यालयात रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनील ब्रेन स्ट्रोक आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. तिच्यावर सध्या पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे रॅगिंग सुरू असून याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती, मात्र पोलिसांनी तेव्हा काहीच कारवाई केली नाही असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दिव्यांग विद्यार्थिनी ही लोणावळ्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये BBA/CA च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून तेथे मुली़च्या हॉस्टेलमध्ये रहात होती. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तिला प्रचंड त्रास दिला जात होता, तिचं सतत रॅगिंग केलं जातं होतं. तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं जायचं, काही विद्यार्थिनी तिच्या मागे चाकू घेऊनही धावत सुटायच्या. याचा पीडितेला खूप त्रास होत होता, या झटापटीत दोन वेळा तर तिला चाकूही लागला.

विशेष म्हणजे हा प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी याप्रकरणी हॉस्टेलच्या वॉर्डनकडे तक्रार केली होती. मात्र काहीच फरक पडला नाही. हे प्रकार सुरूच होते, अखेर तिच्या पालकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तिथेही तक्रार दाखल केली. मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही.

दरम्यान सतत होणारी रॅगिंग  पीडितेला सहन झाले नाही आणि त्यामुळेच तिला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला. तिच्यावर पिंपरी- चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती तिथे आपल्या जीवनासाठी लढा देत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.