मन करा रे प्रसन्न

0

लोकशाही विशेष लेख

जगात सर्वात वेगवान काही असेल तर ते आहे मानवी मन. प्राचीन भारतीय तत्वज्ञान परंपरेत नंतर मानसशास्त्रीय परंपरेत तर अगदी आता पर्यंत मानवी मनाचा अभ्यास चालू आहे. माणसाचे शरीर भरभक्कम जरी असले तरी तो जर मनाने खचला तर अंगाने हत्ती सारखे बळ असूनही तो नाउमेद होतो. ऐन रणांगनावर अर्जुनाची मनस्थिती बिघडली. अशा वेळेस भगवान श्रीकृष्णानी अर्जुनाला योग्य मार्ग दाखवला. उपदेश करून त्याचे मन प्रबळ केले.आजही ज्यावेळेस माणूस विचारांच्या गोंधळात सापडतो, मनाने खचतो त्यावेळेस श्रीमद्भगवद्गीता दिशादर्शकाची भुमिका निभावते.

संत तुकारामांनी ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ असा अनमोल संदेश समाजाला दिला. तर समर्थ रामदास स्वामींचे ‘मनाचे श्लोक’ मानवी मनाला संस्कारीत करण्याचे काम करतात.आपण आज इतके यंत्रवत झाले आहोत की, आपल्या मनाकडेच आपले लक्ष नाही. आपण शरीरसंवर्धनाचा जितका विचार करतो तितका विचार मनबलसंवर्धनाचा देखील करायला हवा. मानवी मन अनियंत्रित जरी असले तरी त्यावर आपण अंकुश ठेऊ शकतो. ध्यान धारणेच्या माध्यमातून आपण एकाग्र होऊ शकतो. मनात जर नकारात्मक विचार येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून जास्तीत जास्त सकारात्मक विचार मनात आणावे. कारण नकारात्मक विचार माणसाला अधोगतीकडे नेतात तर सकारात्मक विचार प्रगतीकडे नेत असतात.

मनुष्याने जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. प्रसन्न मनाने केलेले कार्य नेहमी सफल होते. वैज्ञानिकांचे संशोधन, प्रतिभावतांचे लेखन, कवीची कविता,गायकाचे गाणे, निवेदकाचे निवेदन,कलाकाराची कलाकारी, नटाचा अभिनय, प्राध्यापकांचे अध्यापन आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन, या सर्वांची सार्थकता आणि यशस्विता मनाच्या शांत वृत्तीवर, प्रसन्नतेवर अवलंबून असते. म्हणून प्रसन्न राहणे यातच आपले हित आहे, हे समजावे.

वर्षा रविंद्र उपाध्ये,
जळगाव.

Leave A Reply

Your email address will not be published.