गणेशोत्सवाचा मूळ उद्देश हा राखला गेला पाहिजे

0

माझ्या आठवणीतला गणेशोत्सव – भाग -२ 

“गणेशोत्सवाचा मूळ उद्देश हा राखला गेला पाहिजे. लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेतून गणेशोत्सवाची स्थापना केली, त्याचा उद्देश राखला गेला, तर गणेशोत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही. अलीकडच्या काळात गणेशोत्सवाला फेस्टिवलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे कुठेतरी गणेशोत्सवाचा मूळ उद्देश काहीसा दाबला जात असावा असं मला वाटतं”, असे प्रतिपादन  कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात श्री गणेशाच्या आरतीच्या प्रसंगी केले.

यावेळी आरतीसाठी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी, उद्योजक तथा रोटरीचे समन्वयक नंदकुमार अडवाणी, विपुल पारेख, सुनील सुखवानी, संग्राम सूर्यवंशी, मनीष पत्रिकर, डॉ. पंकज शहा, जितेंद्र भोजवानी, भरत शहा, गोविंद मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.

शुक्रवार रोजी दै. लोकशाही कार्यालयात वरील मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती झाली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी आपल्या आठवणीतल्या गणेशोत्सवाचा जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी ते म्हणाले, “मी मूळचा बऱ्हाणपूरचा. त्या ठिकाणी देखील सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा फार मोठ्या प्रमाणावर राबवली जाते. आम्ही अगदी लहानपणापासून श्री गणेशाला घरी विराजमान करत आलो आहोत. तसं बघायला गेलं तर आमची ही वडिलोपार्जित परंपरा आहे. यात कधीही खंड पडला नाही. आमचे वडीलही गणपती बसवायचे, आम्हीही बसवतो आणि पुढची पिढीही सातत्याने गणपती बसवत आहे.”

“त्या ठिकाणी आम्ही मोहल्यामध्ये फिरायचो. त्या ठिकाणी कॉलनीला मोहल्ले म्हणून ओळखले जातात. याचं एक विशेष असायचं की, प्रत्येकाच्या घरी गणपती बसलेला असायचा. त्यामुळे घरोघरी गणपतीच्या आरतीसाठी आम्ही जात असायचो. तो एक वेगळाच उत्साह असायचा. एक गंमत आठवते. आम्ही दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आमच्या त्या मोहल्यांमध्ये फिरून प्रत्येकाच्या घरी आरतीला जायचो. सात-साडेसात वाजले म्हणजे पुढचा एक तास साखळी पद्धतीने श्री गणेशाची आरती घरोघरी व्हायची. सरासरी पंचवीस तीस घरांमध्ये ही आरती व्हायची. त्यामुळे आमची फार चंगळ असायची. कारण प्रत्येक ठिकाणी मिळणारा प्रसाद हे या आकर्षणाचा कारण असायचं. त्यामुळे तिथे मिळणाऱ्या प्रसादानेच पोट भरायचं. प्रत्येक घरी पौष्टिक असा श्री गणेशाचा प्रसाद मिळायचा. त्यामुळे अधिक उत्सुकता असायची. हल्लीचं स्वरूप बदलले आहे, पण उत्साह मात्र अजूनही तसाच दिसून येतो. आम्ही मात्र आता साधे पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करतो.”

“गणेश विसर्जनाच्या दिवशी आम्ही एक हातगाडी आणायचो. तिला छान पैकी सजवायचो आणि त्यावर मिरवणूक निघायची. रात्रभर ही निवडणूक चालायची. रात्री दोन वाजेला किंवा पहाटेपर्यंत गणेश विसर्जन व्हायचं. इंदोरला देखील मिरवणूक जोरदार निघायची. ही मिरवणूक प्रसिद्ध आहे. तशाच प्रकारची बऱ्हाणपूरची श्री गणेशाची अनंत चतुर्दशीला निघणारी मिरवणूक फार मोठी असायची. पार बाहेर गाऊन ही मिरवणूक बघायला प्रचंड गर्दी होत असे.”

“मला आजही आठवतं आम्ही रात्र रात्र जागून ही मिरवणूक बघायचो.  इंदोरचा गणेशोत्सव फार मोठा. महाराष्ट्रात जसे पुणे मुंबईचे गणेशोत्सव विशेष आकर्षण असतात, तसा इंदोरचा गणेशोत्सव आकर्षणाचा केंद्र असायचा. त्यावेळी टेक्स्टाईल मिल्स असायच्या त्या मिल्सच्या मोठमोठ्या झाकी असायच्या. झाकी म्हणजेच मोठमोठे देखावे. याच्यामध्ये भरपूर रोषणाई असायची. काही जिवंत देखावे देखील असायचे. ते बघायला प्रचंड गर्दी व्हायची. त्या मिल्समध्ये कोणाची झाकी मोठी याच्यावर स्पर्धा चालायची. ते आता सगळं आता फक्त आठवणीत राहिलं आहे.”

 

शब्दांकन : राहुल पवार 

उपसंपादक

दै. लोकशाही

Leave A Reply

Your email address will not be published.