आरटीओची हफ्तेखोरी थांबेल का..?

0

लोकशाही संपादकीय लेख 

आरटीओ कार्यालयातील दलाल आणि आरटीओची हफ्तेखोरी ही एक अनेक वर्षांपासूनची जटील समस्या सुटता सुटत नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण हे अन्यायाविरुध्द आवाज उठविण्यात माहीर आहेत. शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून जळगाव येथील वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्याला खुर्चीला बांधून शेतकऱ्यांच्या मदतीने फरफटत नेल होते. त्यासंदर्भात आ. मंगेश चव्हाणांसह काही शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होवून त्यांना जेलची हवासुध्दा खावी लागली होती. या कालावधीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरुध्द बंड करून प्रसिध्द मिळविण्याचा प्रयत्न मंगेश चव्हाण करताहेत, असा आरोप त्यावेळी त्यांचेवर करण्यात आला. परंतु आता शिवसेना शिंदे गट आणि भाजपची सत्ता असतांनासुध्दा सत्ताधारी पक्षाचा आमदार सर्व सामान्य ट्रकचालकांवर आरटीओकडून होणाऱ्या हफ्तेखोरीविरुध्द सत्ताधाऱ्यांविरुध्द आवाज उठवायला ते मागे पुढे पहात नाहीत. त्यामुळे सर्वसमान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द आ.मंगेश चव्हाण यांना चीड आहे.

हेच चाळीसगाव येथील आर.टी.ओ अधिकाऱ्यांविरुध्द हफ्तेखोरीचा आरोप ट्रकचालकांच्या प्रत्यक्ष तक्रारीवरुन आवाज उठविला. आरटीओ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जळगाव आरटीओचे प्रमुख श्याम लोही यांचेकडेही तक्रार केली. नाशिक विभागाचे आरटीओ आयुक्त यांचे समक्ष आरटीओ अधिकाऱ्यांची भंबेरी उडवली. महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त ढाकणे यांचेशीही बातचीत केली. त्यामुळे सरकार विरोधकाचे असो अथवा सत्ताधारी स्वपक्षाचे असो आ. मंगेश चव्हाण अन्यायाविरुध्द दंड थोपटून उभे असतात. त्यामुळे आ. मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव तालुक्यात लोकप्रियता वाढते आहे. सध्या राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असून आ. मंगेश चव्हाण हे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष मर्जीतले समजले जातात. जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे ते खंदे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांचे पाठीशी भाजपची मोठी शक्ती असल्यने त्यांचे मनोधैर्य वाढलेले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

वीज वितरणच्या अधिक्षक अभियंत्याला शेकडो शेतकऱ्यांच्या कायदा हातात घेवून अभियंत्याला खुर्चीला बांधून ठेवण्याचा प्रकारही त्यांनी केला. तो त्यांनी करायला नको होता. त्याची सजा त्यांना भोगावी लागली. तथापि चाळीसगाव येथील आरटीओ अधिकाऱ्यांची हफ्ते मात्र मंगेश चव्हाणांनी हाती घेवून आरटीओ अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केला. एक एका वाहनचालकांकडून हजार रुपये, दोन हजार रुपये आणि तीन हजार रुपयांपर्यंत हफ्ते वसूल केले जातात. हे प्रमाण त्यांनी दाखवून दिले. आरटीओ अधिकाऱ्यांची चर्चा करतांना हा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच गाजतोय.

आ.मंगेश चव्हाण हे 2019 च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजीव देखमुख यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे ते खंदे समर्थक आहेत. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिंदे -फडणवीस यांचे सरकार दोन महिन्यापूर्वी अस्तित्वात आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील एकनाथराव खडसे यांची सत्ता असलेल्या जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक मंडळाची नियुक्ती केली. त्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष आ. मंगेश चव्हाण हेच होते. अवघ्या काही दिवसातच मंगेश चव्हाणांनी दूध संघात 10 कोटी रुपयांची अनियमितता झाली असल्याचे जाहीर केले होते. आ. मंगेश चव्हाण यांनी दूध संघाच्या भ्रष्टाचारी कारभारासंदर्भात आ. एकनाथराव खडसे यांचेवर भरभरुन टिका केली होती. वास्तविक तोट्यात दुध संघ नफ्यात आला. असे खडसे यांचे म्हणणे आहे. तसेच दूध संघ नफ्यात आला आहे असे खडसे यांचे म्हणणे आहे. तसेच उतराईत असणाऱ्या दूध संघाची रीतसर निवडणूक घेऊन मंदाताई खडसे यांचे अध्यक्षतेखाली दूध संघाच्या कारभार व्यवस्थित रित्या साडेसहा वर्ष पार पडला. आता निवडणूक घेण्याऐवजी संचालक मंडळ बरखास्त करण्याची महाराष्ट्र शासनाची कारवाई बेकायदेशीर आहे. म्हणून त्यांनी त्याला हायकोर्टातून स्थगिती मिळवली.

दरम्यान जळगाव जिल्हा दूध संघाच्या कारभारावर प्रशासक मंडळाच्या वतीने ताशेरे ओढले‌. चौकशी समिती नियुक्त करून चौकशीला प्रारंभ केला. इथे महाराष्ट्र शासनाची पर्यायाने गिरीश महाजन यांची दूध संघ बरखास्त करण्याची घाई झाली असेच म्हणावे लागेल. असो, आता कोर्टाची स्थगिती मिळाली असल्याने त्यावर जास्त भाष्य करणे योग्य नव्हे. सांगण्याचे तत्पर्य प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून ज्या तत्परतेने आ.मंगेश चव्हाण यांनी दूध संघ कारभाराचे वाभाडे काढले ते त्यांच्या तडक-तडफदाराचे लक्षण असते, तरी थोडे संयम बाळगणे आवश्यक होते. अनुभवातून बरेच काही आ. मंगेश चव्हाण यांना शिकायचे आहे. एकनाथराव खडसेंवर ज्या पध्दतीने टिका केली. ते योग्य होते. असे आम्हाला वाटत नाही. अजून पुढे आ. मंगेश चव्हाणांना फार मोठे राजकीय भवितव्य आहे. त्यामुळे त्यांनी थोडे संयम बाळगावे हाच त्यांना मोलाचा सल्ला.

Leave A Reply

Your email address will not be published.