रावेर लोकसभा जागेसाठी अनेक पक्षांच्या नजरा

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा या दोन मतदारसंघांपैकी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जणू सर्व प्रमुख पक्षांनी इच्छा व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी असला तरी, आतापासून या मतदारसंघातून विविध पक्षांच्या वतीने मशागतीस प्रारंभ केला आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही वेळेला रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे या प्रचंड मताधिक्यांनी निवडून आल्या आहेत. २०१४ ला लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. त्या लाटेत खासदार रक्षा खडसे विजयी झाल्या. २०१९ साली मोदी लाट नसताना सुद्धा काही राष्ट्रीय भावनिक परिस्थितीच्या कारणावरून २०१४ पेक्षा जास्त खासदार भाजपचे निवडून आले. २०१९ ला राज्यात भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची युती होती. त्यामुळे महाराष्ट्रात ४८  पैकी भाजपचे २३ आणि शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे सासरे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे सुद्धा भाजपमध्येच होते. खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व गेल्या ३० वर्षापासून केले असल्याने तसेच जळगाव जिल्ह्यातील भाजप पक्षाची वाढ करण्यात आणि जिल्ह्यात राजकारण रुजविण्यात मोलाचा वाटा होता. रावेर लोकसभा मतदारसंघातील अगदी विदर्भातील मलकापूर आणि नांदुरा या तालुक्याचा समितीवर असलेल्या तालुक्यात नाथाभाऊंचा दांडगा जनसंपर्क असल्याने जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि जामनेर या तालुक्यातून भाजपला चांगले मतदान झाले. आता परिस्थिती बदलली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विधान परिषदेची आमदारकी सुद्धा मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खासदारकीची निवडणूक लढविणाऱ्या ज्या नावांची घोषणा झाली. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून सुनेची सुद्धा नावाची घोषणा झाली. त्यामुळे सून आणि सासरे यांच्यात होणारी लढाई कशी असेल याचे चित्र रंगविले जात आहे. त्यामुळे भाजप तर्फे एकनाथराव खडसे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, त्यांच्यासमोर निवडून येणाऱ्या पर्यायी उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याचे कळते. यामध्ये माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, माजी खासदार कै. गुणवंतराव सरोदे यांचे सुपुत्र अतुल सरोदे तसेच उद्योगपती श्रीराम पाटील यांच्या नावासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

 

काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे युती होऊन एकत्रितपणे निवडणूक लढवली तर काँग्रेसला ही जागा मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी राहील आणि ती काँग्रेसला मिळेल असा आमचा विश्वासही आहे, असे उल्हास पाटलांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले होते. त्यामुळे काँग्रेसला ही जागा महाविकास आघाडीच्या युतीतर्फे मिळाली तर मग एकनाथ खडसेंची उमेदवारी आपोआपच रद्द होऊ शकते. महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतर्फे उमेदवार दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांतर्फे तिरंगी लढत होऊ शकते. काँग्रेस पक्षातर्फे तरुण उमेदवाराला संधी देण्याचे धोरण असून तसे झाले तर रावेर लोकसभा मतदारसंघातून उल्हास पाटलांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील या काँग्रेस पक्षाचे उमेदवार असू शकतात. खुद्द डॉक्टर उल्हास पाटील यांनी सुद्धा हे मान्य केले आहे. गेल्या वर्षभरापासून रावेर लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात डॉक्टर केतकी पाटील यांचे दौरे आणि गाठीभेटी वाढलेल्या आहेत. तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने डॉक्टर केतकी पाटील यांची पावले पडत आहेत. एक तरुण महिला नेतृत्व आणि कोरी पाटी असलेल्या चेहरा म्हणून डॉक्टर केतकी पाटलांकडे पाहिले जाते. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या व्यतिरिक्त शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे सुद्धा रावेर लोकसभा मतदारसंघावर दावा केला असला तरी तो त्यांच्या अंतर्गत दाबावा दबाव तंत्राचा भाग असून भाजपलाच शिवसेना साथ देईल यात शंका नाही. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघातर्फे सुद्धा रावेर लोकसभा मतदारसंघावर नेते अनिल चौधरी यांना सुद्धा त्यांच्या स्वभावानुसार दबाव तंत्र टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात काही तथ्य नाही, याची सर्वांना कल्पना आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.