लोकसभा निवडणुकीवर २३ देशांच्या निवडणूक आयोगाची नजर

0

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलिया, रशिया, श्रीलंका आणि बांगलादेशसह २३ देशांच्या निवडणूक आयोगातील सदस्य भारतात दाखल झाले आहेत. विविध देशांतून आलेले हे ७५ सदस्य छोट्या-छोट्या समूहांमध्ये महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातसह सहा राज्यांचा दौरा करतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने शनिवारी दिली.

भारतीय निवडणूक प्रणालीतील लहान लहान गोष्टींबरोबर उपयोगात आणल्या जाणाऱ्या पद्धतीची माहिती या विदेशी सदस्यांना करून दिली जाणार आहे. भागीदारीच्या आधारावर विदेशी प्रतिनिधींचा हा पहिला दौरा असल्याचे आयोगाने म्हटले. ऑस्ट्रेलिया, रशिया, श्रीलंका, बांगलादेशशिवाय भूतान, मंगोलिया,
मेडागास्कर, फिजी, किर्गिज प्रजासत्ताक, मोल्दोवा, ट्यूनिशिया, कंबोडिया, नेपाळ, फिलिपिन्स, झिम्बॉब्वे, कजाकिस्तान, जॉर्जिया, चिली, उज्बेकिस्तान, मालदीव, पापुआ न्यू गिनी आणि नामिबिया या देशांच्या सदस्यांचा या दौऱ्यात समावेश आहे. ‘इंटरनॅशनल फाऊंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टम्स’ (आयएफईएस) चे सदस्य, भूतान आणि इस्रायल प्रसार माध्यमांचे समूहदेखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, अन्य दोन आयुक्त ज्ञानेश कुमार व सुखबीर सिंह संधू रविवारी या विदेशी सदस्यांना संबोधित करतील. हे सदस्य महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशचा दौरा करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.