मन की बात
सत्ता आणि घराणे हे समीकरण नवे नाही. देशात गेल्या 75 वर्षांपासून लोकशाही आहे पण काही मोजक्या कुटुंबाकडेच सत्ता आहे अशी ओरड नेहमीच होताना दिसते. कित्येक वर्षांपासून नेहरू – गांधी हे घराणे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली होते हे आपल्याला तर माहितच आहे. पण देशातल्या विविध राज्यातही एकाच कुटुंबाकडे जास्त काळ मुख्यमंत्रिपद राहिल्याचे चित्र समोरच आहे. मुख्यमंत्रिपदच नाही तर आमदार – खासदार या पदांसाठी देखील घराणे किंवा कुटुंबाची मोठी ताकद असल्याचे दिसते. स्थानिक पातळीपासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंत एकमेकांशी नाते असलेले लोकच राजकारणात प्रभावशाली ठरले आहेत. कुटुंब एक अन् पक्ष अनेक असेही समीकरण राजकारण्यांनी जोडले आहे.
सत्ताबदलाच्या निमित्ताने राज्यातले राजकारण ढवळून निघाले. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करून सत्तास्थापन केली. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने बंड करुन भाजपने या गटाला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री झाले. सत्तेच्या या सारीपाटात कोणता नेता कुठल्या पक्षात आणि कुणाच्या बाजूने आहे हे कळेनासे झाले आहे. असे असले तरी कोण कोणत्या कुटुंबात आहे किंवा कुणाचे नाते कुणाशी आहे हे तर आपण जाणून आहोतच.
सन 2019 च्या निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिले असतांनाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी घरोबा करीत जनतेच्या मतांचा अनादर करुन सत्ता स्थापन करीत राजकारणात नवा पायंडा घातला. उद्धव ठाकरेंच्या या भुमिकेमुळे भाजप कमालीचा अस्वस्थ झाला आणि या घटनेचा बदला घेण्याचा डाव आखत शिवसेनेतच फुट घडवून आणली. एकनाथ शिंदेंनी बंडाचे निशान हाती घेत भाजपाला साथ तर दिलीच शिवाय मुख्यमंत्रीपदही पदरात पाडून घेतले. केंद्रामधील भाजप सरकारने पुढचा डाव अजित पवारांवर साधला आणि त्यांनीही शिंदेंच्या पाऊलावर पाऊल ठेवून राष्ट्रवादीतही फुट पाडली; अजित पवारही सत्तेचा सोपान गाठण्यासाठी भाजपाच्या मांडीवर जावून बसले.
गेल्या पाच वर्षात राज्यातील सारेच पक्ष सत्तेत आले मात्र जनता नामनिराळी राहिली. 2019 मध्ये लाव रे तो व्हिडीओ अशी डरकाळी फोडणारे मनसेचे राज ठाकरेही आता भाजपाच्या गळाला लागले आहे. गत काळात आपण ज्यांच्यावर तोंडसुख घेतले त्याच नेत्यांचा गोडवा गाण्याची वेळ या नेत्यांवर का येते? राजकारण हे सेवेचे साधन आहे असे म्हटले जात असले तरी ते साफ खोटे आहे. राजकारण हे सत्तेचे आणि अर्थकारणाचे खरे साधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसमुक्त’ भारत करण्याची घोषणा दिली होती मात्र त्यात भाजपच ‘काँग्रेसयुक्त’ झाला आहे. आजची स्थितीत तर इतकी भयावह झाली आहे की कोण कुणाच्या पक्षात आहे हे सांगता येत नाही.
दोन वर्षांपूर्वीची ही घटना दि. 23 फेब्रुवारी 2022 मध्ये घडलेली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अनेक तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. नवाब मलिक यांनी बाजार भावापेक्षा खूप कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. दाऊद इब्राहीमची बहीण हसीना पारकरचे निकटवर्तीय असलेल्या सलीम पटेल याच्याकडून त्यांनी मालमत्ता खरेदी केली होती. हे प्रकरण 22 वर्षे जुने आहे. त्यात ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरींग ॲक्ट म्हणजेच पीएमएलए अंतर्गत कारवाई केली. या कारवाई नंतर भाजपने राज्यभर जोरदार आंदोलने करीत त्यांच्या विरोधात रान उठविले होते. आता याच नवाब मलिक यांचे नेते अजित पवार भाजपसोबत असल्याने मलिक ‘बाहेर’ आहेत. जानेवारी 2021 मध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एनसीबीने ड्रग्जशी संबंधित प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अटक केली होती. आता शाहरुख खान हे भाजपाचे गोडवे गातांना दिसत आहेत.
दुसरी घटना ऑक्टोबर 2017 मधील.. नारायण राणेंवर 300 कोटी रुपयांच्या मनी लाँडरींगचा आरोप आहे. हेच नारायण राणे ऑक्टोबर 2017 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी एनडीएसोबत (भाजप) आघाडीची घोषणा केली. सध्या नारायण राणे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. पण नारायण राणेंच्या विरोधातील गंभीर आरोपांची चौकशी झाली का? केंद्रीय संस्थांनी काही कारवाई केली का? या प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असे आहे. हेच राणे काँग्रेसमध्ये असतांना त्यांनी मोदी व भाजपवर तोंडसुख घेतले होते. 300 कोटींच्या घोटाळ्याचे भाजपने भांडवल करुन त्यांच्या विरोधात बरळ ओकली होती. तोच भाजप पक्ष आज ‘नारायण राणे… आगे बढो’चा नारा देत आहे.
ही दोन्ही प्रकरणे एकाच राज्याची आहेत. सुज्ञ नागरिकांसाठी ही दोन प्रकरणे बरेच काही सांगून जातात… गल्लीबोळात तर अशी एकाहून एक प्रकरणांची मालिका आहे. वर्षानुवर्षे न्यायासाठी खेटे मारणाऱ्या जनतेच्या पदरात काय पडते? पाच वर्षे दुर्लक्षित असलेले मतदार आता निवडणुकीच्या हंगामात ‘राजा’ होणार आहे. अनेक दिवस शोधूनही न सापडणारे नेते आता गल्लोगल्ली नजसेर पडतीत.. त्यांचे काम झाले की पुन्हा तोच कित्ता.. शेवटी काय तर यात जनताच मुर्ख ठरविली जात आहे.