सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वैर, पाप अन् अभिमानाचा त्याग करणे

0

प्रवचन सारांश – 02.11.2022 

सुखी होण्याचा सुलभ मार्ग आगम शास्त्रात सांगितला गेला आहे. वैर, पाप, अभिमान हे सोडले तर आपण सर्वांचे भले होवो, सर्व सुखी होवोत ह्या गोष्टी सत्यात उतरवू शकतो. हाच सुखी होण्याचा खरा मार्ग आहे. ह्या गोष्टी तशा कठीण आहेत परंतु प्रयत्न करावे. वैरभाव, पाप व अभिमान सोडून सर्व सुखी बनू या असे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले.

जैन धर्मग्रंथात चार शरण सांगण्यात आलेले आहेत. चार शरणांचे फक्त स्मरण जरी केले तरी दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होते. धर्म आराधना केली तर दुःखात घाबरायचे कारण नाही. तुम्ही धर्माच्या शरणी आलात तर धर्मच तुमचे रक्षण करत असतो. ‘मेरी भावना’ प्रवचन श्रुंखलेत डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर म.सा. यांनी अंजना व पवन कुमार यांची कथा पुढे सांगितली.

आर.सी. बाफना स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री. पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम आता शेवटच्या चरणात पोहोचला आहे.

आपल्या प्रवचनात अंजनाच्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे तिला ह्या जन्मात दुःख सहन करावे लागत आहे असे मुनीराज यांनी सांगितले. अंजना घनदाट जंगलात होती व आपल्या इष्ट देवतांच्या जप, स्मरणात लीन होती. धर्माच्या प्रति ती अजून अधिक जास्त जुळली. एका गुहेत अंजना व तिची मैत्रीण वसंतमाला हिने आसरा घेतला. त्या गुहेत आधीच एक सिंह होता. तो सिंह त्या दोघांवर हल्ला करणार तोच एक सिंह तिथे आला व दोघे सिंह भांडत गुहेच्या बाहेर निघून गेले. देवकृपेने अंजनाचा जीव वाचला. बाळाचे रडणे ऐकून आकाशातील विमान खाली उतरले. त्या विमानात हनुमानपुर येथील तिचे मामा होते. मामाला सर्व हकिगत सांगितली. मामाने त्यांना आपल्या नगरात आणले. परंतु त्या विमानातून बाळ एका भल्या मोठ्या दगडावर पडले परंतु बाळ वज्रदेही होते ती शिला तुटली परंतु बाळाला कोणतीही इजा झाली नाही. इकडे पवनकुमार यांनी युद्ध जिंकले. घरी आल्यावर पवनकुमार यांनी खरी काय ती परिस्थिती सांगितली.

सगळ्यांना पश्चाताप झाला व अंजनाचा शोध सुरू झाला. अंजनाचा विरह पवनकुमार यांना सहन होऊ शकला नाही. पवनकुमार यांनी स्वतःला चितेच्या स्वाधिन करण्याची घोषणा केली. चिता पेटविली गेली चितेत प्रवेश करणार तोच अंजना सुखरुप असल्याची आनंदाची वार्ता समजली. धर्माच्या शरण गेल्यामुळे इतके दुःख सहन करण्याची ताकद अंजनामध्ये आली. अंजनाने आपल्या जीवनात आलेले सर्व प्रसंग सांगितले. अशी सुखांत कहानी पवनकुमार व अंजनाची होती.

संसारातील सर्व जीवन सुखी रहावे ही अपेक्षा सर्वांनी मनात धरणे ही मानवीय वृत्ती म्हटली जाते. मानव, पशू, राक्षस आणि दैव अशा चार प्रकारच्या व्यक्ती संसारात असतात. मेरी भावना या रचनेत दिलेली शिकवण सर्वांनी अमलात आणून सुखी होऊ या असे पू. जयपुरंदर म.सा. यांनी प्रवचनातून आवाहन केले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.