जीनवाणी श्रवण करणे म्हणजे दुर्लभ संधी !

0

 प्रवचन सारांश – 18 ऑक्टोबर 2022 

पहिली दुर्लभ संधी म्हणजे तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला ती आणि दुसरी दुर्लभ संधी म्हणजे जीनवाणी श्रवण करणे होय. प्रत्येकाने ही संधी अजिबात वाया घालवू नये असे आवाहन डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य जयधुरंधर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात केले.

आजच्या ‘मेरी भावना’ या प्रवचन मालेतील आजच्या प्रवचनात डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य जयपुरंदर म.सा. यांनी सांगितले की, मोहदशेमुळे जीव ‘सत्य’ व ‘तथ्य’पर्यंत पोहोचू शकत नाही. काही वेळा जे दिसते तेच खरे नसते. त्याच्या दुसऱ्या बाजुचा देखील विचार करायला हवा. संसार म्हणजे नाटकच आहे ! प्रत्येकाला आपापली भूमिका साकारावी लागते. संसाराच्या नाट्य मंचाचे दिग्दर्शक कोण ? आपण कठपुतळ्यांप्रमाणे आहोत का ? दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर कठपुतळ्यांची जशी हालचाल होते तशी अवस्था आपली झालेली आहे का ? ह्यावर चिंतन करणे आवश्यक आहे असे प्रवचनात सांगण्यात आले.

‘मेरी भावना’ प्रवचन अंतर्गत राजा हरिश्चंद्र यांची कथा पुढे सांगितली गेली, कर्म चक्रावर कुणाचाही अधिकार किंवा अधिपत्य नसते. करोडपतीचा रोडपती व रोडपतीचा करोडपती झाल्याचे अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. विजय मल्या इतका धनवान होता परंतु तो कफल्लक झालेला आहे. सत्य, न्यायासाठी राजलक्ष्मीला राजा हरिश्चंद्र यांनी सोडून दिले. जे जे राजाच्याबद्दल घडले ते देखील कर्मच म्हणायला हवे. राजाने एका महिन्यात हजार सुवर्ण मोहरा द्यायचे ठरविले आहे. त्यामुळे ते राज्य सोडून अन्य ठिकाणी निघाले. माझ्या प्रजेसोबत आपण न्याय नीतीने वागावे असे राजा ऋषिंना म्हणतात. प्रजेच्या प्रती राजाचे असलेले प्रेम यातून दिसते.

राज्याबाहेर निघाल्यावर राजकुमार रोहीत याला भूक लागलेली असते. झाडावरील फळ त्याला देण्यात आले परंतु राजकुमारला तर भोजन हवे असते. त्याचे राजा व राणी यांना वाईट वाटते. दरम्यान एका नगरीत त्यांनी धर्मशाळा घेतली व राहू लागले. राजघराण्याचे, सूर्यवंशी असल्याने भिक मागून जीवन व्यवहार करणे त्यांना प्रशस्त वाटत नव्हते. कष्ट करून ते राहू लागले. दोन आठवडे उलटले तरी देखील सुवर्ण मोहरांची जमवा जमव होऊ शकली नाही. देणेकरी असल्याने राजाला चिंता लागली होती. धन संचय करणे गरजेचे होते. एक मजूर माणसाला कुणी धनीक इतकी मोठी राशी कशी देऊ शकतो? सगळेच प्रश्नचिन्ह होते. पुढे या कथेत काय होते याची उत्सुकता शिगेला पोहोचणारी आहे. पुढील भाग अवश्य ऐका असे आवाहन करण्यात आले.

जळगाव येथील स्वाध्याय भवनात जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पार्श्वचंद्र म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरू आहे. आगमशास्त्र प्रवचन मालिकेत पू. जयधुरंधर मुनी यांनी प्रवचनात चार दुर्लभ गोष्टींवर भाष्य करणे सुरू आहे. पहिली दुर्लभ गोष्ट म्हणजे मिळालेला मनुष्य जन्म तर दुसरी दुर्लभ गोष्ट म्हणजे जीनवाणी, प्रवचन ऐकण्याची संधी ही आहे. मनुष्य जन्म आणि उत्तम श्रावक – श्राविका हे दोन्ही असले तरी श्रोता, सोता आणि सरोता असे तीन श्रवणाचे प्रकार त्यांनी सांगितले. जो प्रवचन ऐकतो तो श्रोता, जो प्रवचनात झोपी जातो तो सोता आणि मूढता, पूर्वग्रह, तीव्र तीरस्कार अशा चार प्रकारांमुळे एखादा प्रवचन ऐकणारा रसोता बनू शकतो. आपण गुड, बेटर आणि बेस्ट अशी आपली श्रेणी वाढवित जावी असे आवाहन महाराज साहेबांनी प्रवचनात केले.

 ———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.