यद्यपी सत्यम लोक विरुद्धम भाषा विवेक ठेवावा- डॉ. पदमचंद्र मुनी

0

प्रवचन सारांश- दि. 14/08/2022

यद्यपी सत्यम लोक विरुद्धम या तत्त्वानुसार लोकव्यवहारात बोलण्याचा विवेक ठेवला तर बोलण्याने जे कर्मबंध होतात त्यापासून स्वतःला वाचविता येते असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांनी प्रवचनातून केले.

जोवर संसार आहे तोवर ‘स्वार्थ’ व ‘परमार्थ’ आहेत. क्रोधाला थोपवणे त्यामुळे कर्म निर्जरा होईल. समोरचा आपल्याशी क्रोधाने, ओरडून बोलत असेल तर आपण स्तब्ध, स्थितप्रज्ञ असावे. समोरच्याचा तो स्वभाव आहे असे म्हणून सोडून द्यावे. आपण त्याच्यासारखे मुळीच वागू नये, भाषा विवेक सोडू नये. क्रोधकारी, लोभकारी, भयकारी बनू नये. सत्य आहे पण लोक व्यवहारात प्रतिकूल असेल तर ते बोलू नये. मन, वचन व काय पुण्य असे तीन प्रकार सांगण्यात आले आहेत. मधुर वचन सुरू केले तर तुमचे पुण्याचे खाते लगेच सुरू होईल. दुसऱ्यासाठी खोटे, छेदकारी, भेदकारी, मार्मिक, कुणाचे गुपित उघडे करणे, कर्कश, पीडा देणारी भाषा बोलू नये. असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांनी रविवारच्या विशेष प्रवचनातून केले.

जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती १२वे पट्टधर आचार्यश्री पार्श्वचंद्रजी म.सा आदीठाणा ७ यांच्या पवित्र सानिध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू  आहे .

लोक ‘कर्म’ व ‘स्वभावा’ने गरीब असतात. कर्माने गरीब हा श्रीमंत होऊ शकतो. मात्र स्वभावाने गरीब असतात ते कधीच श्रीमंत होत नाही.  या संदर्भात गरीब माय लेकाची गोष्ट आपल्या प्रवचनातून सांगितली. कठोर वचन बोलू नये असे प्रस्तुत गोष्टीत शिकायला मिळते. आई स्वयंपाक करून पाणी भरायला जाते. तिला यायला वेळ झाला. मुलगा आईला रागाने बोलला की, ‘इतका वेळ लागला यायला तू फासावर लटकली होतीस काय ?’ त्यावर आई ही रागाने म्हणाली, ‘तू जेवण तुझ्या हाताने घ्यायला हवे होते. तुझे हात काय तुटले होते का?’ हे घडल्यावर त्यांच्या झोपडीवर झाड पडून माय लेकांचा मृत्यू झाला. कर्म बंध बांधलेले असतात त्यांचे परिणाम भोगावे लागतात.

पुढच्या जन्मी ते मुलगा व मुलगी वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेतात. ते जन्म घेतात ते दोघे घर एकमेकांची मैत्री असलेले योगा योगाने असतात. त्यामुळे जन्माला येण्याआधीच त्यांच्या विवाह ठरलेला असतो. ते मोठे होतात मुलगा व्यापारासाठी निघून जातो. धन कमावून परत येतो सागर प्रवासात त्यांचे जहाज तुटते. मित्र व व्यापारी मुलगा जेमतेम जीव वाचवतात. जे होणारे सासरे असतात तेथे ते पोहोचतात पण अवतार खराब असतो म्हणून त्या नगराच्या उद्यानात थांबतात. योगायोग ती कन्या देवदर्शनासाठी त्या उद्यानाच्या मंदिरात येते. हातातील सोन्याच्या कंगणाच्या मोहामुळे चोर त्या युवतीचे दोन्ही हात तोडून टाकतो. शिपाई चोराचा पाठलाग करतात. चोर  घाबरून व्यापारीपुत्र झोपलेल्या ठिकाणी युवतीचे तुटलेले हात व कंगन सोडून जातो. राजाकडे फिर्याद जाते. फाशीची शिक्षा त्या व्यापारी पुत्राला दिली जाते. परंतु व्यापारी पुत्राचा मित्र सर्व सत्य सांगतो. पूर्व जन्माचे कर्म, कठोर भाषा वापरायचे परिणाम पुढील जन्मी भोगावे लागतात. त्यामुळे कठोर वाणी वापरू नये असे आवाहन प्रवचनातून केले गेले.

——■■——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.