जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरुप । पूजा ध्यान जप त्यासी नाही ॥

0

संत एकनाथ महाराज यांनी आपल्या हरिपाठात अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लोकांना भक्तिमार्ग सांगितला आहे. आपल्या दोन्ही डोळयांनी आपण जे पाहतो ते ते हरिरुप आहे आणि हे पाहायला ध्यान जप तप काहीही करावे लागत नाही. डोळे फक्त उघडे करुन चराचर सृष्टी पाहून घ्या असे नाथबाबा आपणास सांगतात.

मनुष्य देहाला डोळे, हात, पाय, नाक, कान देतांना अवयवांची निर्मिती कशी साचेबध्द केली आहे. दोन डोळे, दोन नाकपुडया, दोन हात, दोन पाय, १ धड व १ लिंग असे १० अवयव देऊन पुन्हा बुध्दी देऊन या मानवी शरीराला चेहरा दिला आहे आणि हे सर्व चेहरे एकसमान एकसारखे नाहीत या सुंदर नरदेहात आत्मा सुध्दा आहे.

डोळ्यांना कधी साधु संत महात्मे व भगवंताची मूर्ती दिसते तशी समाजातली सृष्टीवरील विदारक भयंकर क्रौर्य ही पाहावी लागतात. म्हणून संताच्या डोळयांनी या जगाकडे पाहिले पाहिजे. साडेसातशे वर्षापूर्वी समाजाने अनन्वीत छळ केला, हेटाळणी केली, दुस्वास केला, काहीही गुन्हा नसतांना मारले देखील अशा माऊलींनी या जगासाठी आता विश्वात्मके देवे । येणे वा:गयज्ञे तोषावे । तोषूनी मज द्यावे । पसायदान हे॥ असं मागणं मागावं काही माणसं डोळे असून अंध व्यक्तिकडे भीक मागतात. दृष्टीने कशी व्यापक आपल्या दोन डोळयांमध्ये संपूर्ण सृष्टी साठवता येईल अशी पाहिजे.

वैकुंठ कैलासी तिर्थक्षेत्री देव । तयावीण ठाव रिता कोठे ।
वैष्णवांचे गुहय मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहता नाही ।

वैकुंठात देव आहेत, पृथ्वीतलावर आहेत, देव चराचर सृष्टीत अणुरेणुत भरला आहे. अशी जागा नाही त्या ठिकाणी देव नाही ? वैष्णव माणसाची देवाबद्दलची कल्पना एकांत म्हणजेच मोक्षाचा मार्ग असे नाथ बाबा सांगतात. अनंताचा अंत कुणालाही पाहता आला नाही, येणार नाही अशा स्थिती अनंतानेच निर्माण केली आहे.

आदि मध्य अंती । अवघा हरि एक ।
एकची अनेक एक हरि॥
एकाकार झाले जीव शिव दोन्ही ।
एका जनार्दनी एैसे केले ॥

परमेश्वर अनादी अनंत आहे जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरुन तो परमात्मा उरला आहे. जीव शिव दोन्ही एकत्र आले म्हणजे मानसाला भगवंताची ओळख होते असे संत एकनाथ महाराज आपले गुरु जनार्दन स्वामींना स्मरुन म्हणतात. डोळे असून काही उपभोग शून्य स्वामी चष्मा लावत नाही त्यांना भगवंत सोडा साधं जेवतांना केस, बारीक काडी कचरा सुक्ष्म जीव दिसत नाहीत. परमेश्वर अंत:चतक्षुंनी पाहता आला पाहिजे तशी दृष्टी आपोआप येत नाही ती जनादर्नासारख्या गुरुंनी नाथ महाराजांना दिली. डोळयांनी या सृष्टीचे रुप पाहावे आणि पाहता पाहता रुप पाहता लोचनी ही अनुभूती यावी डोळे भरुन भगवंताची मूर्ती अंत:करणात साठवून ठेवली तर स्मरणाने भगवंत आपल्या जवळ येतो पण मनाची एकाग्रता व दशेंद्रियांची तल्लीनता हा भाव निर्माण झाला पाहिजे.

काही माणसं पंढरपूरला जातात आणि नेमकं देवापुढे गेले की, दोन्ही हात जोडून डोळे गच्च मिटून घेतात. पुढे भगवंत उभा आहे आणि हे ओळीने पुढे सरकवले जात आहेत. त्यापेक्षा पांडूरंगाला भेटून काही क्षण उघडया डोळयांनी हे सुंदर रुप डोळयात साठवून बघा किती आनंद मिळतो तो. दृष्टी आहे म्हणून सृष्टी आहे. हा भाव साधु, संत, महात्मे, परमहंस यांच्या दृष्टीस असतो. ध्यान धारणेत डोळे मुर्ध्वनी अवस्थेत ठेऊन तपाचरण करणारे खडतर साधना करतात त्या साधनेच्या बळावर त्यांनी नुसती वक्रदृष्टी केली तरी आग लागते. डोळयांमध्ये सामर्थ्य आहे. भगवंताच्या वाटेवर डोळे उघडे करुन उभ्या असलेल्या राधे नं ते दिसल्याशिवाय पापणी मिटली नव्हती हा व्दापर युगातला इतिहास आहे.

रमेश जे. पाटील
आडगाव ता. चोपडा जि. जळगाव (खान्देश)
मो. ९८५०९८६१००

Leave A Reply

Your email address will not be published.