गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतातच विसर्जन करून गणेशकृपा संपादन करूया !

0

लोकाध्यात्म विशेष लेख    

धर्मशास्त्रांत ‘श्री गणेशमूर्ती ही शाडूमाती वा चिकणमाती यांपासून बनवलेली आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली असावी, तसेच तिचे आणि निर्माल्याचे विसर्जन वहात्या पाण्यात करावे’, असे ‘पूजासमुच्चय’ आणि ‘मुद्गलपुराण’ या ग्रंथात म्हटले आहे. गणेश चतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधीही आहे. उपासनाविधींमुळे गणपतीच्या तत्त्वाने समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन जलात केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच वहात्या पाण्याबरोबर ही पवित्रके सर्वदूर पोहोचतात व अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास मदत होते. मात्र पर्यावरणाच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत स्थानिक प्रशासनासह तथाकथित पर्यावरणवादी म्हणवून घेणारे, नास्तिक, पुरोगामी गणेशॊत्सवात मूर्तीदान, कृत्रिम हौद यांसारख्या चुकीच्या संकल्पना राबविताना दिसतात आणि हिंदू बांधव याला बळी पडत आहेत. पूर्वापार धार्मिक प्रथा-परंपरेनुसार गणेश मूर्ती विसर्जन हे जलक्षेत्रात केले जात आहे ही पद्धत चालू राहायला हवी. समुद्र / नदी / अन्य जलक्षेत्रात विसर्जन करण्यास कोणताही विरोध असू नये अशी मागणीही गणेश भक्तांनी करायला हवी. धर्मशास्त्रांत सांगितलेले सर्व सण-उत्सव हे पर्यावरणपूरकच आहेत. सध्याचे उत्सवांचे पालटलेले स्वरूप मूळ धर्मशास्त्रीय स्वरूपाकडे नेल्यास धर्माचरण होऊन पर्यावरण रक्षणही होईल.

गणेशमूर्तीचे दान करण्याचे अशास्त्रीय आवाहन !

जलप्रदूषणाचे कारण पुढे करून काही धर्मद्रोही संघटना मूर्ती विसर्जनाच्या ऐवजी मूर्तीदान करण्याचे आवाहन करतात. परंतु मूर्तीदान करणे, हे अशास्त्रीय तसेच धर्मद्रोही कृत्य आहे; ‘कारण गणेश चतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधी आहे. देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे; देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही, गणेशाची मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे की, जिचा उपयोग संपला म्हणून ती दुसर्‍याला दान म्हणून दिली !’ ही सूत्रे गणेशभक्तांनी लक्षात घेतली पाहिजेत. धर्मशास्त्रानुसार पाण्यातच मूर्ती विसर्जन होणे महत्त्वाचे आहे. दान केलेल्या मूर्ती नंतर खाणीतच टाकल्या जातात आणि त्यासाठी कचर्‍याच्या गाड्यांचा उपयोग केला जातो, रस्ता बुजवण्यासाठी मूर्तीचा वापर केला जातो अशा अनेक घटना यापूर्वी महाराष्ट्रात घडल्याचे समोर आले आहे. मूर्तिदानाच्या आवाहनाला भाविकांनी बळी न पडता गणेशभक्तांनी गणेशमूर्तीचे (वहात्या पाण्यात) विसर्जनच करावे.

कृत्रिम हौदाची चुकीची संकल्पना !

देव-धर्म न मानणार्‍या मंडळींच्या नादी लागून ‘मूर्तीविसर्जनामुळे जलप्रदूषण होते’, असा बागुलबुवा उभा करत पारंपारिक वहात्या पाण्यातील विसर्जनाला विरोध चालू झाला आणि गेल्या काही वर्षांत अनेक शहरांतील पालिका प्रशासनाने कृत्रिम हौदात मूर्तीविसर्जन करण्याची नवी कुप्रथा चालू केली. काही तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि पुरोगामी नदीप्रदूषणाच्या नावाखाली अमोनियम बायकार्बोनेट मिसळलेल्या कृत्रिम हौदांमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा सल्ला देतात आणि प्रशासनही त्यानुसार कृती करते. मुळातच असे करणे धर्मशास्त्रविरोधी आहे. अमोनियम बायकार्बाेनेट या केमिकलमुळे त्वचेचे रोग उत्पन्न होतात हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे. वर्षभरात शहरातील अब्जावधी लिटर अतिदूषित सांडपाणी नदी-नाल्यांत सोडले जात असतांना त्याविषयी निष्क्रिय असणार्‍या महानगरपालिका, तथाकथित पर्यावरणप्रेमी आणि पुरोगामी गणेशोत्सव आल्यावर मात्र प्रदूषण रोखण्यासाठी सक्रिय होतात. गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण असे विचित्र समीकरण मांडून कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक हितसंबंधांतून कृत्रिम हौद बांधण्याचे नाटक केले जात आहे, असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. या हौदांत गणेशमूर्तींच्या विसर्जनाचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात तेथे विसर्जित केलेल्या मूर्ती काढून महापालिका नंतर त्या घनकचरा विभागाच्या गाडीतून नेऊन पुन्हा नदीच्या पात्रातच फेकत असल्याचे पुण्यातील विविध प्रसिद्धीमाध्यमांनी छायाचित्रांसह यापूर्वीच उघड केले आहे. हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले.

सध्याचे कृत्रित हौद न्यायालयाच्या सूचनेनुसार नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार एका तळाच्या एका कोपर्‍यात जाळीची भिंत तयार करून तेवढ्या पाण्यात विसर्जन करावे. नंतर काही कालावधीनंतर त्या मूर्ती विसर्जित कराव्यात.असा प्रयोग नवी मुंबई महानगरपालिकेने अनेक वर्षे चालू ठेवलेला आहे.

लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून हौद बांधण्यापेक्षा लोकांच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करण्यासाठी शासनाने निधी खर्च करावा. हौदात विसर्जित केलेल्या मूर्तीनंतर पुन्हा नदी आणि तलावात विसर्जित करतात, असेही अनेकदा सिद्ध झालेले आहे. मग लाखो-कोट्यवधी रुपयांचा केलेला खर्च पाण्यात घालवण्यासारखे नाही का ? कृत्रिम हौदाचा हा दिखाऊपणा कशासाठी ? ठिकठिकाणी उभारले जाणारे कृत्रिम हौद हे आता राज्यकर्त्यांसाठी पैसे खाण्याचे माध्यम बनवले आहे. त्यातून पर्यावरणाचे किती रक्षण होते हा प्रश्‍न असला, तरी राज्यकर्ते आणि पालिकेच्या अधिकार्‍यांचे खिसे भरले जातात, हे मात्र नक्की आहे. हौदात विसर्जित केलेल्या मूर्ती खड्डे बुजवण्यासाठी, विहिरी बुजवण्यासाठी वापरल्या जातात. हे योग्य आहे का ? हे भक्तांनी ठरवावे ! त्या पेक्षा भक्तांना विसर्जन करता यावे म्हणून वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास सोपे होईल. असे तेलंगणा सरकारने केले आहे. आपल्या देवतांची भक्तीभावाने पूजलेली मूर्ती आपण कृत्रिम तलावातील रसायनयुक्त पाण्यामध्ये टाकणार का ? की धर्मशास्त्रानुसार पाण्यात विसर्जित करणार ? याचा भक्तांनी आता विचार करायला हवा !

सध्या ठिकठिकाणी स्थानिक प्रशासन चालवत असलेल्या अशास्त्रीय मूर्ती विसर्जन करण्याच्या भूमिकेमुळे अनेक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. प्रत्यक्षात पर्यावरणाची हानी ज्या गोष्टींमुळे होते, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे. जागरूक गणेशभक्तांनी मूर्तीदान आणि कृत्रिम तलावाच्या संकल्पनेला बळी न पडता नैसर्गिक जलस्रोतातच गणेशमूर्ती विसर्जन करून गणेशकृपा संपादन करूया !

संकलन-  दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था

संपर्क- 9284027180

Leave A Reply

Your email address will not be published.