शुकादिक मुनि विरक्त संसारी । रामनाम निर्धारी उच्चारिले ॥

0

पंचरत्न हरिपाठ म्हणजे पाच तत्वांचा मेळ, पृथ्वी, वायु, तेज आकाश व पाणी यांनी मिळवून जगत्‌ नियंत्याने आदिमाया शक्तीच्या सहाय्याने या भुतलावर सुंदर नरदेह रुपी स्त्री-पुरुष या दोघांची निर्मिती केली. निसर्गरम्य सृष्टी निर्माण करतांना विविध चवींची रंगाची फळे, फुले, पाने निर्मिली. नद्या डोंगर पशु पक्षी चिडी मुंगी पासून कोटयानुकोटी जीव निर्माण केले. सर्वांचे आयुष्य निर्धारीत केले.

आदिमाया शक्तीने मानव निर्माण करतांना त्यास बुध्दी, शक्ती, चातुर्य दिले. ब्रम्ह देवाने सृष्टी निर्माण करावी, विष्णु भगवानांनी जीवाचे पालन पोषण करावे. महेशाने मृत प्रेते नाश करावीत. हे ज्याचे त्याचे कर्म महाविष्णुने तिघा देवांना नेमून दिले. स्वत: मात्र आपण पृथ्वीतलावर ज्यावेळी अनर्थ माजतो हाहा:कार उठतो. गाय- ब्राम्हण दु:खी होतात. संपूर्ण जग त्राही माम्‌ करु लागते त्यावेळी क्षीर सागरात लक्ष्मी सोबत शेषाचे आसन करुन राहणारे भगवान महाविष्णु अवतार घेतात. भगवंताच्या दशावतारात राम, कृष्ण हरि हे प्रमुख अवतार – कलीयुगात भगवान शंकरापासून त्रिदेव ब्रम्हा, विष्णु, महेश एकत्र आले आणि या भुतलावर आपले अस्तित्व राहावे म्हणून अत्री ऋषींच्या व अनुसयामातेच्या पोटी दत्तमुनिंनी अवतार घेतला.

नाथपंथी घराण्याचे दत्तभगवान यांनी मच्छिंद्रनाथांना अनुग्रह दिला. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना मग पुढे ही परंपरा निवृत्ती नाथंपर्यंत चालत आली आहे. शके ११९५ सोमवार माघ वद्या प्रतिपदेस प्रात:काळी पहाटेच्या वेळी निवृत्तीनाथ हया धगधगत्या वैराग्याने ओतप्रोत भरलेल्या या चंडाशुंनी जन्म घेतला. यावरुन माऊलीसहित चौघा भावडांचा जन्म नाथपंथात झाला. उपजतच अध्यात्म संपन्न, ज्ञानसंपन्न, विवेकशील, सत्वशील व सात्वीक वृत्तीचे कुलकर्णी ब्राम्हण परिवारात चौघा भावडांनी जन्म घेतला. पंचरत्न हरिपाठात श्री ज्ञानदेव, श्री एकनाथ महाराज, श्री. नामदेव महाराज, श्री. तुकोबाराय व श्री निवृत्तीनाथ यांनी तयार केलेले काही निवडक अभंग आहेत. आळंदी येथील श्री. रंगनाथ महाराज खरात यांनी छोटया पुस्तिकेच्या आकारात पंचरत्न हरिपाठ नित्य पठणासाठी वाचकांना समर्पीत केले आहेत. ऋषीचे मुळ आणि नदीचा उगम शोधू नये असे म्हणतात. परंतु श्रीमद भागवत कथा जेथे जेथे होते तेथे शुक शौनक व व्यास वाल्मिकादी ऋषी मुनिंचा उल्लेख केल्याशिवाय हया कथा पूर्णत्वाला जात नाहीत. शुक मुनि विरक्त होते.

शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ॥

असे म्हटले गेले आहे. तपसामर्थ्यामुळे योगशक्ती मिळते. मग अशी माणसं संसारात विरक्त वृत्तीने राहतात. संसारात धन संपदा गाडी बंगला, नोकर चाकर हे मिळाले म्हणजे आपण खूप काही कमावलं असा काहींनी करुन घेतलेला एक गोड गैरसमज असतो? विरक्त वृत्तीच्या मानसांना हया पैकी काहीही नको असते. छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांसाठी नजराणा पाठवला होता पण आम्हा तो मृत्तिकेसमान आहे असे म्हणून तो परत पाठवला ही वृत्ती म्हणजे विरक्ती…। विरक्त वृत्ती अंगी बाणण्यासाठी स्वार्थत्याग करावा लागतो. संसारात काही माणसं आपण निर्लोभी आहोत, विरक्त आहोत असे काही बोलून दाखवतात पण प्रत्यक्षात प्रसंग आला की इतके खालच्या स्तरावर जातात की, विचारायची सोय नसते.

माझे एक जवळचे मित्र होते ज्या ज्या वेळी मला समाजात काम करतांना विविध संस्थांकडून पुरस्कार मिळायचे हे बघून तो म्हणायचा कसा ? हया असल्या पुरस्कारापेक्षा जनतेचा पुरस्कार महत्वाचा मोठा असं मी समजतो…एक दोनदा मी त्याला सोबत पुरस्कार स्विकारण्यासाठी आयोजित समारंभाला नेलंही पण, त्याचं काही लक्ष लागेना “काय यार ? भुक लागली आणि या आयोजकांनी काय कार्यक्रम इतका लांबवतात ?” मी काय समजायचं ते समजून गेलो नंतर मात्र अशा मित्रांना मी माझा सन्मान, सत्कार जेथे होत असेल तेथे या लोकांना चार हात दूर ठेवले. दुसऱ्याच्या आनंदात जे आनंद मानतात किंवा दु:खात जे सहवेदना व्यक्त करतात ते खरे मित्र इतर भाकर भाऊंना दूर ठेवलेले बरे ? असं समजून घेऊन मी त्यांना दूर ठेवले. ‘

समाजात काही पुरस्कार वा बक्षिसी ही लायकीच्या आधारावर मिळते त्यासाठी निरपेक्ष नि:स्वार्थ भावनेनं काम करावे लागते. मनी- ध्यानी नसतांना काही वेळेला अचानक निरोप फोन वा पत्र मिळतं की, आपणास अमुक एक पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यावेळचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. कर्म, धर्म, वर्म सांभाळून चौघा भावडांना मातृ पितृ वत प्रेम देऊन त्यांना समाजात मान्यता मिळवून देणं हे निवृत्तीनाथांना त्यावेळी एवढं सोपं नव्हतं ब्राम्हणांकडून झालेला छळ, हेटाळणी, दु:स्वास हे सारं सोसून ज्यांनी माऊलींना ज्ञानेश्वरी, अमृतानुभव लिहण्याची प्रेरणा दिली त्या तेजोमय ज्ञानसुर्य विरक्त वृत्तीच्या निवृत्तीनाथांना कोटी कोटी वंदन …..।

– रमेश जे. पाटील
आडगांव ता.चोपडा जि. जळगाव
मो. 9850986100

Leave A Reply

Your email address will not be published.