अलंकापुरी पुण्यभुमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र..!

0

देवाची आळंदी म्हणजे अलंकापुरी जेथे ज्ञानदेवांनी समाधी घेतली त्या योगींचे हे गाव. जगाची माऊली म्हणून विश्वबंध अशा ज्ञानराजांनी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपीका या दोन ग्रंथाची निर्मिती करून अध्यात्म ज्ञानाचा प्रचार व प्रसार केला. त्यायोगेच भागवत धर्माची स्थापना करता आली. ‘अमृतानुभव’ हा ग्रंथ वाचल्यानंतर अमृताची गोडी चाखायला मिळाली अशीही अनुभूती मिळते.

ज्ञानेश्वरीने आजपर्यंत वाचकांना अभ्यासकांना जे चैतन्य दिले आहे ते अलौकिक आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीत, शब्दाशब्दात आणि अक्षरात चैतन्य इतके भरले आहे की त्याची गणतीच नाही. मानवी मनाची कवाळे सहस्त्रदल कमळाप्रमाणे विकसीत होवून  उघडल्यावर जे तेज भ्रमर सेवन करतो त्यानुसार मानवानेही ज्ञानेश्वरी पासून अध्यात्मबोध घेऊन आपले जीवन उजळून तेजोमय करून घेतले पाहिजे.

जगभरातील मराठी माणसांना ज्ञानोबा तुकारामांच्या बाबतीत कमालीचे कुतूहल आणि जिज्ञासा आहे. ज्ञानदेव त्या काळी जे जीवन जगले ते आध्यात्मिक उत्कांती व उन्नतीने भरलेले होते. समाजाने केलेल्या अन्यायाच्या झळांनी चारही भावंडे करपून गेली होती. आचेने होरपळून निघाली होती. आजचा काळ त्यामानाने खूप बरा आहे असे नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर माणुस स्वच्छंदी झाला. काही मोकाट झाले. आई वडिलांचे आदर्श, आजी आजोबांची पुण्याई, समाजातले नैतिकपण या सगळ्या बाबींना तीलांजली देत स्वैराचारानं  उन्मत्त झालेली माणसं पशुतुल्य आचरण करतांना दिसतात.

सामुहिक बलात्कार, व्यसनाधिनता, अनाचार एवढा वाढला की आपण आर्यव्रतात राहतो की, पाश्चिमात्य देशात ? हा प्रश्न पडतो. सामान्य माणसाचं जगणं कठीण झालं आहे. निर्धन कितीही बुद्धिमान, चारित्र्यवान असला तरी त्याचे स्थान कोपऱ्यात आहे. पद, प्रतिष्ठेसाठी पैसा खर्च करणाऱ्यांनी सत्तेची जागा हडपलेली आहे. आर्थिक शोषण सुरु आहे. पाखंडी मतवाद्यांची चलती आहे. अशा या संक्रमण काळात मानवाच्या गरजा दिवसेंदिवस वाढत आहेत. या आधीच्या साडेसातशे वर्षापूर्वी सामाजिक अन्याय सहन करून माऊलींनी संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितले, हा केवढा मोठा उदात्त विचार आहे.

मानव जातीला समाज विघातक व आत्मघातक आत्मविस्मृतींच्या अध:पतनातून व सामुहिक ऱ्हासातून आत्मोन्नतीच्या झगझगीत प्रकाशात जागवण्यासाठी संत भुतलावर अवतरित होत असतात. नितीमुल्यांना अवकळा येते. अनैतिकतेची वृद्धी होते. अधर्म धर्माला गिळंकृत करू पाहतो त्या काळी भगवंत अवतार घेत असतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाविष्णुचा अवतार..! देवांच्या अवतार कार्याचे प्रयोजनही विशिष्ट आहे असते आणि राहील. श्रीसंत नामदेव महाराजांनी आपल्या गाथेत म्हटले आहे: –

राजे भ्रष्ट झाले | ठायी ठायी दोष जडले ॥

मग ईही अवतार घडले | कलिदोष हरावया ॥ 

माऊली ज्ञानराज, तपस्वी योगि निवृत्तीनाथ, सत्  चित् आनंद स्वरुप सोपानकाका न योगसामर्थ्यांने तळपती ब्रम्हवादिनी मुक्ताई या चौघा भावंडाचे अवतार कलियुगातला अंधार दूर करण्यासाठी झाला. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी अमृतानुभव या ग्रंथाचे वाचन केल्यावर हे सगळे उलगडून धगधगीत आत्मज्ञान निवडून काढता येईल.

शिव तो निवृत्ती | सोपान ब्रम्हस्थिती || 

ज्ञानदेव मूर्ती श्रीविष्णुची हे । ब्राम्हणी हे कळा |

 माय मुक्ताबाई | विचारून पाही स्वयंमुक्ता || 

अशा पूज्य भावपूर्ण अंतःकरणांनी मराठी संत महात्म्यांनी अध्यात्मसंपन्न ज्ञानसंपन्न बाल योग्यांचे चरित्र गायन केले आहे. भक्तिचा तो अविरत पाझरणारा झरा आजही अखंड सुरु आहे. म्हणून तर ज्ञानेश्वरी, हरिपाठ चांगदेव पासष्टी, अमृतानुभव ताटीचे अभंग यावर पी. एच्. डी करणारे हजारो विद्यार्थी अध्ययन कार्यात गुंतले आहेत.

“सा विद्या विमुक्तये” 

असा उपनिषदांनी घोष केला आहे. जी विद्या आत्मसाक्षात्कारासाठी सहाय्यभूत ठरते तीच खरी विद्या होय. ज्ञानेश्वर माऊलींची वाणी याच आत्मानुभूतीने वरील घोषाला सदैव उजाळा देत राहिल. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई ही चारही भावंड म्हणजे स्वरुपज्ञानी, द्वंदातीत नित्य – शुद्ध बुद्ध मुक्त चैतन्य तेजस्वी होते म्हणून साडेसातशे वर्षानंतरही जगात त्यांचे अमरत्व अबाधित अगोचर आहे. उदरभरण करण्यापूर्वी आजही अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र हा श्लोक म्हटल्याशिवाय घास पोटात जात नाही… !

रमेश जे. पाटील

आडगाव ता. चोपडा जि. जळगांव (खान्देश)

 ९८५०९८६१००

 

Leave A Reply

Your email address will not be published.