बहुत जन्मांचा सेवट नरदेह सांपडे अवचट !

0

करुणाष्टक- 21

कितेकीं देह त्यागिले तूजलागीं I पुढें जाहले संगतीचे विभागी II
देहेदु:ख होताचि वेगीं पळालों I
तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों II

कोणतेही जीवन हे जन्म आणि मृत्यू यांच्याशी जोडलेले आहे. मेला म्हणजे संपला असे चार्वाक समजतात. मेल्यानंतर जीव थडग्यात पडून राहतो मग केव्हा तरी एकदा शेवटच्या दिवशी ईश्वरी निवाड्याप्रमाणे तो आपल्या पापांचे फळ भोगण्यासाठी नरकात वा पुण्याचे फळ भोगण्यासाठी स्वर्गात जातो असे काही म्हणतात.

हिंदू धर्म जन्म व मृत्यू यांचे चक्र मानतो प्रत्येक जीवन हे पूर्वजन्म आणि पूनर्जन्म यांनी युक्त आहे आणि त्याचे स्वरूप माणसाच्या कर्माप्रमाणे निश्चित होते. कर्माची योग्यता पारखावी लागते ती यासाठीच. जे जे जन्मास आले ते ते नियमाने मेले आहेत. थोर माणसाला मृत्यू हा चुकलेला नाही. प्रत्येकाचे इहलोकीचे जीवन संपुष्टात येते.मरणाला मारून राहणे म्हणजे एकतर मुक्त होणे किंवा सत्किर्ती रूपाने राहणे.

समर्थ म्हणतात,”कितेकी देह त्यागिले तुज लागीI” आपल्याकडे चार योनी सांगितल्या आहेत.पहिली योनी जरायुज, ज्याला जरा आणि आयु आहे त्याला जरायुज म्हणायचे.दुसरी योनी अंडज,अंड्यापासून जन्माला येणारा तो अंडज.तिसरी योनी स्वेदज, म्हणजे घाम वगैरे पासून जन्माला येणारे जीव. चौथी योनी उद्गीज म्हणजे वृक्षादि वगैरे. अशा चार प्रकारच्या योनी आहेत. अंडज म्हणजे उडणारे जे पक्षी आहेत आणि सरपटणारे प्राणी.बांडगुळे वगैरे स्वेदज मधली आहेत आणि वृक्षादि लतावेली ज्या आहेत त्या सगळ्या उद्विग्न योनी आहे किंवा या पृथ्वी मधून मातीमधून निर्माण होणाऱ्या आहेत. ज्यांना जरा म्हणजे वार्धक्य आहे आणि आयु म्हणजे आयुष्य आहे अशी योनी सगळ्यात महत्वाची आहे कारण ती मानवाची आहे.
चौर्‍यांशी लक्ष योनी वर तुकाराम महाराजांनी एका अभंगच लिहिला आहे.

“अकरा लक्ष योनि किड्यांमाजी घ्याव्या I
दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये II
तिसलक्ष योनि पशूंचीये घरी I
मानवभितही चार लक्ष II”

आणि असा एक एक योनि कोटी कोटी फेरा घेतला म्हणजे मनुष्य देहाचा वारा लागतो.

प्रश्न असा पडतो की अंडज, स्वेदज, उग्दिज्य योनी जाऊन मानवाचा देह कसा मिळतो? आणि केव्हा मिळतो ? संत एकनाथ म्हणतात,काकतालीय न्यायाने. याचा अर्थ कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडते. म्हणजे कावळा बसला म्हणून ती वृक्षाची फांदी मोडली असे नव्हे,मोडायला आलीच होती ती पडणार होती पण केवळ योगायोगाने कावळा येऊन बसला आणि फादी पडली हे जसे अचानक योगायोगाने घडते तसे नाथ म्हणतात, अचानक मानव देह आपल्याला प्राप्त होतो.

हा मानव देह किंवा नरदेह लाभला ही भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे तो मिळाल्यानंतर त्याचा नाश करू नये. स्वतःचा घात स्वतः करून घेऊ नये. “खाओ पिओ मजा करो” एवढ्याच तत्वात त्याच मातेर करू नये. “उतो नये,मातो नये, भक्तीचा वसा टाकू नये” कारण हा नरदेह दुर्लभ आहे. जनावराला आहार, निद्रा, मैथुन याच्या पलीकडे काही असत नाही. संस्कृती कोण निर्माण करतो? ती मानव निर्माण करीत असतो. त्याला स्वातंत्र्य आहे. स्वकर्तुत्वाने त्याला उन्नत होता येते. प्रारब्ध भोगल्याशिवाय मानवाची सुटका नाही. प्रारब्ध भोगले तरी उरलेले संचित कधीतरी प्रारब्ध होऊन दत्त म्हणून उभे राहते. क्रियमाण कर्म तुझ्या हातामध्ये असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू कुसंगाकडून सत्संगाकडे जा. दैवी संपत्तीची कास धर. थोडा विवेक, वैराग्य अंगी असू दे.तिमीरातुन प्रकाशाकडे चल.देह केव्हा पडेल हे सांगता येत नाही. म्हणून उपासना करून ईश्वर प्राप्ति तु साध.

आत्म उन्नतीच्या मार्गावर चालू लाग. समर्थांनीही आपला खेद व खंत व्यक्त केला आहे. अरे मी किती देह त्यागले कुणास ठाऊक? कर्माप्रमाणे कोण कोणती गती लाभली हे ही ठाऊक नाही?इथ हा विचार सर्वमान्य आहे. “आता तरी जागे व्हा” असं समर्थांना सुचवायचं आहे कारण देहाला दुःख होताच सारे निश्चिय डळमळतात. आपली दाढ किंवा दात दुखायला लागली की सार लक्ष तिकडेच जाते व भजन राहत. ह्यात अतिशयोक्ती नाही. शरीराला देहदु:ख होताच उपासना घडत नाही व उपासना करण्यासही जे अभिप्रेत असते त्यातही प्राण, इंद्रिय व शरीर याची आटणी होत असते. तेव्हाही देहदंड सोसावा लागतो. एकूणच सहनशक्ती आपल्याजवळ असेल तर काही उपासना घडू शकते. परमहंस रामकृष्ण म्हणतात, मूळाक्षरात ‘स’ तीन वेळा आलाय सहनशक्ती, सहन करणे याला जीवनात महत्त्व आहे.

स्वतः समर्थ उपासनेच्या बाबतीत “देह दुःख ते सुख मानीत जावे, विवेकी सदा स्वरूपी भरावे” या धारणेचे होते. समर्थ रामदासांच्या मागील तेवीस पिढ्यात शुद्ध उपासना चालत होती व त्यातूनच “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” या न्यायाने समर्थां सारखं तेजपुंज धगधगीत वैराग्याचे राम उपासक जन्माला आले. ज्यांना ‘रामा’ शिवाय अन्य काहीही नको होते.

“बहुत जन्मांचा सेवटI नरदेह सांपडे अवचटI” हे त्यांचेच वचन. त्याचा आपणही लाभ करून घेऊ या. थोडीशी यथाशक्ति- मती- बुद्धीने शुद्ध उपासना करूया व आपले आयुष्यही कृतार्थ करण्याचा प्रयत्न करूया.

II जय जय रघुवीर समर्थII

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.