करुणाष्टके.. अंत:प्रेरणेतून श्रीरामरायाला मारलेली हाक !

0

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, अनेक थोर संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. श्री रामदास समर्थ हे एक थोर महाराष्ट्र संत आहेत. त्यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या लहानशा गावी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. त्यांनी समाज जागृतीसाठी गृहत्याग केला, भारत भ्रमण केले. त्यांचे मनाचे श्लोक, दासबोध ग्रंथ तसेच करूणाष्टके महाराष्ट्रातील लोकांचे दैवत बनले आहे. माघ महिना म्हणजे लागलीच डोळ्यापुढे येते दासनवमी. सन 1682 माघ शुक्ल पक्षाचे नवमीला, वयाच्या 73 व्या वर्षी श्री रामदास स्वामी ब्रह्म समाधीत लीन झाले. या त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण त्यांनी निर्मिलेल्या करुणाष्टकांचे निरुपण, विवेचन, चिंतन, अवलोकन करूयात.

करूनाष्टके म्हणजे श्री समर्थांनी अंत:करणातून, अंत:प्रेरणेतून श्रीरामरायाला अत्यंत आर्ततेने मारलेली हाक. अंतकरण जेव्हा परमेश्वराच्या कृपेसाठी परमेश्वराच्या आशिर्वादासाठी अत्यंत व्याकुळ होते, ते व्याकूळ अंतकरण व त्या अंतकरणातून उमटलेले शब्द म्हणजे करुणाष्टके. ही एक प्रार्थना आहे आणि येथे समर्थांच्या मनातील भावनांचा कल्लोळ प्रकट झालेला आहे .

करुणाष्टकांमध्ये ईश्वराची “करुणा” भाकली आहे. ही प्रार्थना कोणत्याही ऐहिक लाभासाठी नाही, धनसंपदेसाठी नाही, व्यक्तिगत स्वार्थासाठी तर नव्हेच, तर काम- क्रोध इत्यादी षंडरिपूंमुळे संसारिक विषय उपभोगाच्या लालसेने आपली झालेली दयनीय अवस्था दूर व्हावी म्हणून केलेली प्रार्थना आहे. या सर्वातून आपणास प्रभू रामचंद्र बाहेर काढतील असा विश्वास समर्थांना आहे.

गेल्या दोन वर्षापासून आपण covid-19 महामारीने ग्रस्त झालेले आहोत. या संकटाला तोंड देत असताना आता नुसतं निरोगी शरीर ठेवून चालणार नाही तर मन सक्षम ठेवणारे, थकलेल्या मनाला उभारी देणारे, सामर्थ्य देणारे असे काही तरी हवे. कारण शरीर व मन म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. करुणाष्टकांचे चिंतन, अवलोकन ही आजच्या काळाची गरज म्हणूनच निर्माण झालेली आहे. आज होरपळलेल्या तापलेल्या जीवाला, मनाला शांत करणारी आहेत. या काळात ती आपल्याला संजीवनी किंवा इम्मुनिटी बूस्टर म्हणून सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. आपण नित्य पाठातील करुणाष्टकांचे चिंतन दर गुरुवारी व सोमवारी करणार आहोत. अबालवृद्धांना विशेष करून तरुणांना करुणाष्टके दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतील.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.