लोहारा लघुपाटबंधारे धरणात मृतसाठा तर बांबरुड धरणात झिरो

लोहारा वासियांची गंभीर पाणीटंचाईकडे वाटचाल

0

लोहारा (ज्ञानेश्वर राजपूत), लोकशाही न्यूज नेटवर्क 

मागील वर्षी लोहारासह परिसरात जोरदार दमदार पाऊस न झाल्याने धरण क्षेत्र भरले नाही. त्यामुळे लोहारा वासियांना पाणीटंचाई सहन करावी लागली. या टंचाई निवारणार्थ प्रशासनाने शासनाकडे टँकर उपलब्धतेचा ठराव पाठवला होता. तसे लोहरा गावात तीन टँकर वरिष्ठ पातळीच्या निर्णयानुसार प्राप्त झाले.  या टँकरनेच पाणी उपलब्ध करून अजूनही पाणीपुरवठा सुरू आहे.  मागील वर्षाच्या तुलनेपेक्षा यंदाही कमी पाऊस पावसाळ्यातील तीनही महिन्यात लोहारा परिसरात जोराचा किंवा दमदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे धरण क्षेत्रात पाणीच न आल्याने मृत साठेची जलपातळी लोहारा लघु पाटबंधारे म्हसास् गावाजवळील धरणात दिसून येत आहे.

या धरण क्षेत्रात लोहारासह, रामेश्वरतांडा ,म्हसास् या गावांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर आहेत. यामुळे तीनही गावांच्या नागरिकांचे हाल होणार आहे हे मात्र नक्की आहे.  लोहारा गावास पाणीपुरवठा करणारी दुसरी जुनी योजना बांबरुड धरणावरून आहे.  यात सुद्धा शून्य प्रमाणात पाणी असल्याने या परिस्थितीतून लोहारा वासियांची गंभीर पाणीटंचाईकडे वाटचाल होणार असेच जाणवते. तात्काळ गंभीरता म्हणून मुक्या प्राण्यांना आरक्षण म्हणून म्हसास् धरणातील पाणी आरक्षित ठेवण्यासाठी परवानगी धारक शेतकऱ्यांच्या मोटारीसुद्धा लघुपाटबंधारे विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाई करून त्या उचलण्याची गरज आहे.

अन्यथा परवानगीधारक यांच्या नावाखाली काही अनधिकृत शेतकऱ्यांकडून येथे पाण्याची चोरी होण्याची दाट शक्यता आहे. कारण पावसाने पाठ फिरवल्याने तोंडाशी आलेला घास अपुऱ्या पावसाअभावी शेतकऱ्यांचा हिरावला जाऊ शकतो, यातून असलेला मृत साठाही गायब होईल.  त्यात लोहारा गावासाठी वाघुर धरणावरून पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळालेली असून पाईपलाईनचे काम सुरू आहे.  पण ते किती प्रमाणात झाले याबाबत माहिती प्राप्त होऊ शकली नाही.  संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी पाणीटंचाईचा विचार करीत लवकरात लवकर जलद गतीने काम पूर्ण करून ही जलवाहिनी सुरू करण्याची नितांत गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.