डॉक्टरला मारहाण करणाऱ्या महिला पोलीस निलंबित; अधीक्षक एम. राजकुमार यांनी केली कारवाई…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील नीलकमल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ. नीरज चौधरी यांना मारहाण करणाऱ्या शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिल्पा राठोड यांना पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. तसे आदेश सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी काढण्यात आले असून राठोड यांची विभागीय चौकशीदेखील होणार आहे.

डॉ. नीरज चौधरी हे रविवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी नीलकमल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह कारने आले होते. त्या ठिकाणी कार लावण्यावरून वाद झाला व दोन नारळ विक्रेत्यांनी डॉक्टरची कॉलर पकडून व त्यांच्या सहकाऱ्यांवर कोयता उगारला होता. त्यानंतर त्या ठिकाणी शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचारी शिल्पा राठोड या तेथे आल्या व त्यांनी डॉ. नीरज चौधरी यांना मारहाण केली होती. या प्रकरणी डॉ. नीरज चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस कर्मचारी शिल्पा राठोड यांना तडकाफडकी निलंबित केले. तसे आदेश काढण्यात आले असून राठोड यांच्या विभागीय चौकशीचेही आदेश दिले आहे.

कर्तव्याला न शोभणारे काम केल्याने कारवाई…

डॉक्टरला मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचारी शिल्पा राठोड यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. विनापरवानगी त्या कर्तव्य सोडून गेल्या व त्यांनी कर्तव्याला न शोभणारे काम केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

– एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक.

Leave A Reply

Your email address will not be published.