कुल्लूमध्ये बस दरीत कोसळली, 3 IIT विद्यार्थ्यांसह 10 ठार…

0

 

हिमाचल प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क:

हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे पर्यटकांचे वाहन दरीत कोसळून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) वाराणसीच्या तीन विद्यार्थ्यांसह दहा पर्यटकांचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. बंजार उपविभागातील घियाघी येथे रविवारी रात्री झालेल्या या घटनेत अन्य दहा जण जखमी झाले.

पाच जखमींना कुल्लूच्या झोनल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कुल्लू जिल्ह्याचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, प्राथमिक अहवालानुसार वाहनामध्ये चालकासह 17 लोक होते.

पीएम मोदींनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे पर्यटकांचे वाहन खड्ड्यात पडल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो, तसेच जखमींना सर्वतोपरी मदत केली जात आहे आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.

त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘कुल्लू जिल्ह्यात एका वेदनादायक रस्ता अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबियांना बळ देवो. जखमींना लवकरात लवकर आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

 

कुल्लूचे पोलिस अधीक्षक (एसपी) गुरदेव सिंग यांनी सांगितले की, या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. पाच जखमींना कुल्लू येथील झोनल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून पाच जणांवर बंजार येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.