नासाने शोधले प्राचीन कृष्णविवर

0

कॅलिफोर्निया : नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने अंतराळात सर्वात जुने आणि सर्वात दूरचे कृष्णविवर शोधून काढले आहे. हे कृष्णविवर विश्वाच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात असून ते त्याची संपूर्ण आकाशगंगा गिळंकृत करीत असल्याचे मत खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
केम्ब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने या कृष्णविवराचा शोध लावला आहे. त्यांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करून सर्वात जुन्या कृष्णविवराचे निरीक्षण केले. हे कृष्णविवर १३ अब्ज वर्षांहून अधिक जुने आहे, म्हणजेच बिग बँगनंतर सुमारे चारशे दशलक्ष वर्षांनंतर ते निर्माण झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. सुपरनोव्हा स्फोटात प्रचंड तारे नष्ट होतात. सामान्यतः
कृष्णविवर त्यावेळीच तयार होतात. गुरुत्वाकर्षण शक्तींमुळे त्यांचे कोर कोसळतात. हे गुरुत्वाकर्षण इतके तीव्र असते की, त्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. काही कृष्णविवरे तारकीय टक्करींमुळे तयार होतात. काही सरुवातीच्या विश्वातील
असून त्यांना ‘डायरेक्ट कोलॅप्स ब्लॅक होल’ म्हणतात. हे अगदी सुरुवातीच्या आकाशगंगा एकमेकांशी आदळल्याने तयार झालेले आहेत. हे कृष्णविवर सूर्याच्या वस्तुमानाच्या १.६ दशलक्ष पट असून विश्वाच्या निर्मितीनंतर चारशे दशलक्ष वर्षांनी त्याची
निर्मिती झाली आहे. एवढ्या मोठ्या कृष्णविवराची विश्वात इतक्या लवकर वाढ होणे मुळातच अशक्य आहे. त्यामुळे केम्ब्रिज खगोलशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या कृष्णविवराचा जन्म त्याच्या सध्याच्या आकारातच झाला असावा. खगोलतज्ज्ञांच्या
कल्पनाशक्तीपेक्षाही विशाल असलेले हे कृष्णविवर त्याची आकाशगंगा जीएन-झेड ११ गिळंकृत करीत असून ही आकाशगंगा पहिल्यांदा २०१६ मध्ये खगोल शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलेली ही सर्वात दूरची आकाशगंगा होती. असे मानले जाते की, कृष्णविवर इतक्या वेगाने ऊर्जा उत्सर्जित करीत आहे की, ते जीएन-झेड ११ आकाशगंगेतील वायूही वाहून नेऊ शकते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.