कृष्णाचे चरित्र आजही प्रेरणादायी, उपयोगी…

0

 

प्रवचन सारांश- 18/08/2022

 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारागृहात जन्म झाला असे श्रीकृष्ण यांचे चरित्र आजच्या काळात देखील खूप प्रेरणादायी, उपयोगी ठरते. कृष्णाचे उत्तम गुण आपल्यात उतरवावे असे आवाहन कृष्ण जन्माष्टमीच्या औचित्याने विशेष प्रवचनात करण्यात आले.

 

कोणतीही व्यक्ती जन्माने नव्हे तर कर्माने महान ठरते. जैन धर्माच्या ग्रंथामध्ये, जैन दर्शनमध्ये श्रीकृष्ण यांचा अनेकदा उल्लेख आलेला आहे. ते 22 वे तीर्थंकर अरिष्टनेमी यांचे चुलतभाऊ होते. त्यांना 16 कला अवगत होत्या. श्रीकृष्णाचे चरित्र हिंदू सनातन धर्म व जैन धर्मासाठी खूप मोलाचे ठरते. या महापुरुषांचे जीवनचित्र आजही अखंड प्रेरणादायी आहे. कृष्णाने याच महिन्यात अष्टमीला कारागृहात जन्म घेतला. त्यांच्या जन्माष्टमी निमित्ताने त्यांच्या गुणांचे स्मरण करू या असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी प्रवचनात केले. यावेळी कृष्ण व कंस यांची सविस्तर कथा सांगण्यात आली.

 

जयगच्छाधीपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये ‘आगम शास्त्र’ विषयक जयधुरंधर मुनी तर ‘मेरी भावना’ या विषयी प्रवचन मालिका सुरू आहे. याशिवाय त्या त्या प्रासंगीक महत्त्वानुसार देखील प्रवचन होत असते. श्रीकृष्णाबाबत आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. यांनी सुंदर रचना केलेली आहे ती रचना देखील प्रस्तुत होईल असे आवर्जून सांगण्यात आले.

 

‘आगम गाथा’ प्रवचन श्रुंखलेत जयधुरंधरमुनी यांनी बोलणेविषयी 8 वचन व्यवहाराबाबत सोदाहरण सांगितले. कमी बोला, गोड बोला, आवश्यकतेनुसार बोला. ह्या पहिल्या 3 लोकव्यवहारानंतर अवसरनुसार किंवा प्रसंगानुसार बोला, मर्मभेदी बोलू नका, अहंकारी भाषा नका बोलू, अहितकारी नका बोलू आणि 8 वे वचन व्यवहार म्हणजे हितकारी, विवेकयुक्त भाषा उपयोगी आणा म्हणजे पापकर्मापासून स्वतःला दूर ठेऊ शकू असे प्रवचनात सांगितले.

 

यावेळी तपस्या, आराधना करणाऱ्यांचे कौतुक अनुप्पेहा ध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी यांनी विशेष मार्गदर्शनपर वक्तव्यात केले. तपश्चर्या ही शोभा व आत्म्याचे कल्याण करण्यासाठी आहे. केवलज्ञान प्राप्तीनंतर देखील तीर्थंकर तपश्चर्या, साधना, आराधना का करत याबाबत चिंतन करायला हवे. जो दृढसंकल्पी, मनाने बलशाली असतो तोच तपश्चर्या करू शकतो असे सांगण्यात आले. जयगच्छाधिपती 9 वे पट्टधर आचार्याश्री जीतमलजी म.सा. यांच्याबद्दल सांगून येणाऱ्या पर्युषण पर्वावर आराधना, तपश्चर्या करावी असे आवाहन त्यांनी केले.

—————-■■————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.