धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना पेट्रोल टाकून जाळले !

0

3 प्रवाशाचा होरपळून मृत्यू ; केरळमधील कोझिकोडमधील घटना

कोझिकोड , लोकशाही न्यूज नेटवर्क

धावत्या रेल्वेमध्ये अंगावर पेट्रोल टाकून प्रवाशांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार केरळमधील कोझिकोडमध्ये उघडकीस आला आहे. इलाथूरजवळ अज्ञात व्यक्तीने महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. महिलेला वाचवण्यासाठी आलेल्या सहप्रवाशांच्या अंगावरही पेट्रोल शिंपडून आरोपीने आग लावली. ही घटना अलप्पुझा-कन्नूर मेन एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या D1 डब्यात रात्री 10 वाजता घडली. या घटनेत 3 प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झालेत. पोलिसांनी सांगितले की, मृतांत एका महिला व मुलासह पुरुषाचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह रात्री उशिरा इलाथूर रेल्वे स्थानकाच्या रुळावरून जप्त करण्यात आले.

जखमीपैकी पाच जणांना कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, तर इतर तिघांना कोझिकोडच्या बेबी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्यूटिव्ह एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री 9.45 वा. ही घटना घडली. रेल्वेने कोझिकोड क्रॉस करताच 2 प्रवाशांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला पेटवून दिले. यामुळे अन्य प्रवाशांनी चेन ओढून रेल्वे थांबवली व घटनेची पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना प्रवाशांनी सांगितले की, एक महिला व मुलगा रेल्वेतून बेपत्ता आहे. पोलिसांनी या दोघाचाही शोध सुरू केला आहे. दुसरीकडे, रेल्वे स्थानकाच्या रुळावर महिला, मुलगा व एका पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या मते, आग लागल्यामुळे या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल किंवा ते रेल्वेतून पडले असतील. दुसरीकडे, आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस आसपासच्या सीसीटीव्हीची मदत घेत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.