कायद्याचे ज्ञान जाणून घेण्यासाठी बालके पोहोचली पोलीस ठाण्यात…

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

एकीकडे 15 ते 20 वर्ष वयोगटातील तरुण गुन्हेगारीच्या कचाट्यात सापडुन पोलीस ठाण्यात जेलची हवा खात असताना दुसरीकडे 10 ते 15 वयोगटातील काही बालके पोलीस प्रशासनाच्या कामाची पद्धत आणि कायद्याचे ज्ञान जाणून घेता यावे यासाठी अमळनेर पोलिस ठाण्यात पोहोचल्याने पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी या बालकांचे कौतुक करत त्यांचे स्वागत केले.

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” असे पोलिसांचे ब्रीदवाक्य मात्र याचा नेमका अर्थ काय? कोणताही गुन्हा केला तर त्याचे परिणाम काय? कायदा कलम म्हणजे काय? कोणता गुन्हा केल्यास कोणते कलम लागतात, जेलची हवा कशी असते? तेथे सोय कशी असते? पोलिसांचे अधिकार कोणकोणते? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चोर व गुन्हेगार कसे असतात. असे अनेक प्रश्न एका बालक मंडळींच्या समूहाला पडल्याने या प्रश्नांची उत्तरे आपणास मिळावी अशी त्यांची खूप इच्छा होती. सुरवातीला आई वडिलांकडे हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर फारशी समाधानकारक उत्तरे त्यांना मिळू शकली नाहीत, अशा परिस्थितीत पोलीसच आपल्याला अपेक्षित उत्तरे देऊ शकतील हे त्यांना लक्षात आले. आणि यासाठी उन्हाळी सुट्ट्याची वाट ते पाहत होते. अखेर परीक्षा आटोपल्यावर खेळाचे मैदान टाळून थेट पोलीस ठाण्यात भेट देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी आईवडीलांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन त्यांना मिळाले. सुरवातीला पोलीस निरीक्षकांच्या नावे त्यांनी आपल्या अक्षरात पत्र लिहून पोलीस ठाण्यात येण्याची परवानगी मागीतिली. या पत्रात मुलांना पोलीस ठाण्यात यायचे आहे मात्र गुन्हा केला म्हणून नव्हे तर गुन्हा का? करू नये हे जाणून घेण्यासाठी हे वाचून पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना आनंद झाल्याने त्यांनी तात्काळ परवानगी देऊन त्यांना पोलीस ठाण्यात निमंत्रित केले.

या बालकांमध्ये नाविन्य शेवाळे, योगेश शिंगाने, दर्शन मोरे, भाग्येश पाटील, सुशील पाटील, स्वरा पाटील यांचा समावेश होता. ही बालके पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांना प्रत्येक विभागात नेऊन सविस्तर माहिती देण्यात आली. पोलीस कर्मचारी सुनिल जाधव यांनी मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच कारागृह आणि त्याबद्दल सविस्तर माहितीही मुलांना मिळाली. सविस्तर माहिती दिल्याने बालकांनी पोलिसांचे आभार मानले. बालकांना अमळनेर विभागाचे डीवायएसपी राकेश जाधव यांनीही अनमोल असे मार्गदर्शन केले.

मुले गुन्हेगारी पासून परावृत्त होतील…

सद्यस्थितीत वयात येत असलेली काही मुले मोठमोठ्या गुन्ह्यात अडकल्याने त्यांचे करिअर खराब झाले आहे. यासाठी मुलांचे कौन्सिलिंग होणे आवश्यक असून पालकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. यापद्धतीने कायद्याचे ज्ञान जाणून घेण्याचा या मुलांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे तरुण मुले नक्कीच गुन्ह्या पासून कोसो दूर राहतील यात शंका नाही. इतर मुलांनी देखील यापद्धतीचे उपक्रम राबवून गुन्हेगारीपासून दूरच राहिले पाहिजे. असे , पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी प्रतिपादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.