आचार्य अत्रे, शाहीर अमरशेख आणि अण्णाभाऊ साठेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करा – मधुकर भावे

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

१३ ऑगस्ट २०२३ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी करण्यात येत आहे. या महत्वपूर्ण दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने आचार्य अत्रे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करावा आणि संयुक्त महाराष्ट्र घडविण्यात त्यांनी जे योगदान दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. याचबरोबर ज्यांच्या डफावरील थाफेने संयुक्त महाराष्ट्र चळवळ फोफावली त्या शाहीर अमरशेख आणि अण्णाभाऊ साठे यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मधुकर भावे यांनी केली.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मधुकर भावे हे बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आग्रही भूमिका मांडतांना मधुकर भावे यांनी सांगितले की, नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कडे सन्मानपूर्वक दिला होता. त्याचप्रमाणे आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख या महान विभूतींनाही मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त मी महाराष्ट्रात शंभर व्याख्याने देणार असून यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्यावरही शंभर व्याख्याने देणार असल्याचा संकल्प मधुकर भावे यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांसाठी सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ निर्णय घ्यावा, असे सांगतांना मधुकर भावे यांनी सत्तरी ओलांडलेल्या पत्रकारांची व्यथा मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.