खो-खो खेळाची टाईम लाईन

0

लोकशाही विशेष लेख

खो-खो (Kho-Kho) या शब्दाचा अर्थ हुलकावणी देणे, चकविणे असा होतो. ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो-खो” पुस्तकात या खेळाच्या उगमाच्या संदर्भात मांडलेला खालील तर्क पटण्यासारखा वाटतो. आपला देश हा शेतीप्रधान भारतीय संस्कृतीचा आविष्कार आहे. पिकांनी भरलेली शेती जनावरांनी खराब करू नये म्हणून जे विविध उपाय योजले जात असत त्यापैकी त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करून त्यांना पळवून लावणे हा प्रमुख उपाय असे. त्यासाठी शेतात काही ठराविक अंतरावर लहान मुले एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसवून त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज (भो-भो) करायला सांगितले जात असावे. असे या शेत (क्षेत्र) रक्षण वृत्तीतून लहान मुलांचा खो-खो खेळ (पळती/पाठलाग) सुरु झाला असावा.
खो-खो हा खेळ महाराष्ट्रात मागील किती वर्षांपासून खेळला जातो याची माहिती पुराव्यानिशी उपलब्ध नाहीत. मात्र त्यानंतर पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, धुळे अशा मराठी मुलखात गेली पाऊणशे ते शंभर वर्षाच्या काळात खो-खो खेळला गेल्याचा उल्लेख आढळतो.

संतश्रेष्ठ तुकाराम व संत एकनाथांच्या अभंगात देखील या खेळाचा उल्लेख आढळतो.

मागे पुढे पाहे सांभाळुनी दोनी ठाय, चुकावूनि जाय गडी राखे गडीयांसी।
मुरडे दंडा दोन्ही तोंडे गडियां सावध करी, भेटलिया संगे तया हाल तुजवरी।।
– संतश्रेष्ठ तुकाराम

हमामा हुंबरी खेळती एक मेळा, नाना परींचे गोपाळ मिळती सकळा।
अ॓क धावे पुढे दुजा धावे पाठी, अ॓क पळे अ॓कापुढे अ॓क सांडोनी आठी।।
– संत एकनाथ

खो-खो हा खेळ बदलत्या काळाबरोबर मातीसोबतच मॅटवर देखील अतिशय दिमाखात आणि अजून वेगवान स्वरूपात उभारून आलेला दिसून येतो. १९५९-६० साली झालेल्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी केवळ ५ राज्यांचे संघ सहभागी झाले होते. ५ राज्याच्या संघांपासून आज २०२३ साली ३४ देशांचे संघ खो-खो खेळण्यासाठी सिद्ध आहेत. हि एक खूप मोठी मजल या देशी खेळाने मारलेली आहे. भारतीय खो-खो महासंघाचे सचिव महेंद्रसिंग त्यागी, सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा आदी पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने २०२३ म्हणजेच या वर्षीपासून ३० जून हा दिवस राष्ट्रीय खो-खो दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने खो-खो खेळाच्या विकासाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.

खो-खो विकासाची काळरेषा

१९१४-१५: पुण्याच्या डेक्कन जिमखान्याने या खेळाचे नियम बनविले आणि स्पर्धात्मक खो-खो ची वाटचाल सुरु झाली.
१९२२-२३: महाराष्ट्रात आंतर शालेय स्पर्धेत खो-खो खेळाचा अंतर्भाव.
१९३३: अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने सर्वमान्य अशी नियमावली बनवसाठी खो-खो संबंधित सर्व संस्थाकडून आवश्यक ते बदल मागवले.
१९३५: अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाद्वारे सुधारित नियमावली तयार.
१९३६: बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेत प्रात्यक्षिकासाठी खो-खो खेळाचा अंतर्भाव.
१९३८: अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाद्वारे नियमावलीच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन.
१९३८: अखिल भारतीय शारीरिक शिक्षण मंडळाद्वारे पहिल्या आंतर विभागीय स्पर्धेचे अकोला येथे आयोजन.
१९४९: स्वीडन व डेन्मार्क येथे खो-खो खेळाच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन.
१९५५-५६: कलकत्ता येथे भाई नेरुरकर आणि बी. गोपाल रेड्डी यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय खो-खो मंडळाची स्थापना.
१९५६: तत्कालीन मुंबई राज्यापुरती मुंबई राज्य खो-खो संघटनेची स्थापना.
१९५७: मुंबई राज्य खो-खो संघटनेला अखिल भारतीय खो-खो मंडळाची मान्यता.
१९५९: मुंबई राज्य खो-खो संघटनेला सरकारी शिक्षण खात्याची मान्यता.
१९५९-६०: भारतीय खो-खो संघटनेद्वारे पहिल्या पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे विजयवाडा येथे आयोजन.
१९६०: मुंबई राज्य विभाजनानंतर महाराष्ट्र खो-खो संघटनेची स्थापना.
१९६०: महाराष्ट्र खो-खो संघटनेला महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेची मान्यता.
१९६०-६१: अखिल भारतीय खो-खो मंडळाद्वारे पहिल्या महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे कोल्हापूर येथे आयोजन.
१९६०-६१: अखिल भारतीय खो-खो मंडळाद्वारे अष्टपैलू खेळाडूंसाठी एकलव्य पुरस्कार (पुरुष) आणि राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (महिला) देण्यास सुरुवात.
१९६२: महाराष्ट्र खो-खो संघटनेला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची संलग्नता.
१९६३: महाराष्ट्र खो-खो संघटनेतर्फे भाई नेरुरकर (स्मरणार्थ) सुवर्ण चषक अखिल भारतीय स्पर्धांना सुरुवात.
१९६६: भारतीय खो-खो संघटनेची “खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया” या नावाने सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट १८६० अंतर्गत नवी दिल्ली येथे रीतसर नोंदणी.
१९६९-७०: भारतीय खो-खो संघटनेद्वारे कुमार (१८ वर्षाखालील वयोगट) व मुलींच्या (१६ वर्षाखालील वयोगट) गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांना सुरुवात.
१९६९-७०: भारतीय खो-खो संघटनेतर्फे अष्टपैलू खेळाडूंसाठी वीर अभिमन्यू पुरस्कार (कुमार) आणि जानकी पुरस्कार (मुली) देण्यास सुरुवात.
१९७२: भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे खो-खो खेळाच्या सहा आठवडे कालावधीच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमास सुरुवात.
१९७४: भारतीय खो-खो संघटनेद्वारे देवास येथे किशोर (१४ वर्षाखालील वयोगट) व किशोरी (१२ वर्षाखालील वयोगट) गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांना सुरुवात.
१९७४: भारतीय खो-खो संघटनेतर्फे अष्टपैलू खेळाडूंसाठी भारत पुरस्कार (किशोर) आणि वीरबाला पुरस्कार (किशोरी) देण्यास सुरुवात.
१९७७: नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था, बंगळूरू येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे खो-खो खेळाच्या एक वर्षीय पदविका अभ्यासक्रमास सुरुवात.
१९८२: भारतीय खो-खो संघटनेला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची संलग्नता.
१९८२: नवी दिल्ली आशियायी स्पर्धेत प्रात्यक्षिकासाठी खो-खो खेळाचा अंतर्भाव.
१९८२: भारतीय खो-खो संघटनेतर्फे वार्षिक आंतर विभागीय फेडरेशन कप खो-खो स्पर्धेला सुरुवात.
१९८७: कलकत्ता येथे आशियायी खो-खो संघटनेची स्थापना.
१९८७: कलकत्ता येथील तिसऱ्या दक्षिण आशियायी स्पर्धेत प्रात्यक्षिकासाठी खो-खो खेळाचा अंतर्भाव.
१९८७: भारतीय खो-खो संघाचा रशिया येथे झालेल्या इंडो युएसएसआर क्रीडा महोत्सवात सहभाग.
१९८८-८९: महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या पुढाकाराने (व्यावसायिक पुरुष गट) मुंबई महापौर चषक खो-खो स्पर्धांना सुरुवात.
१९९६: कलकत्ता येथे पहिल्या आशियायी खो-खो स्पर्धेचे आयोजन आणि प्रथमच लाकडी पृष्टभागावर सामन्यांचे आयोजन.
२०००: ढाका येथे दुसऱ्या आशियायी खो-खो स्पर्धेचे आयोजन.
२०१६: गुवाहाटी येथील बाराव्या दक्षिण आशियायी स्पर्धेपासून खो-खो खेळाचा या स्पर्धेत कायम स्वरूपी अंतर्भाव.
२०१६: इंदोर येथे तिसऱ्या आशियायी खो-खो स्पर्धेचे १६ वर्षांच्या कालखंडानंतर आयोजन.
२०१८: नवी दिल्ली येथील पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेपासून खो-खो खेळाचा अंतर्भाव.
२०२०: जागतिक खो-खो संघटनेची स्थापना.
२०२१: इंदिरा गांधी इनडोअर स्टेडीयम, नवी दिल्ली येथे सुपर लीग खो-खो स्पर्धेचे आयोजन.
२०२२: श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे अल्टीमेट खो-खो लीग या व्यावसायिक स्पर्धेचे आयोजन.

डॉ. निलेश जोशी
जळगाव
७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.