खामगाव न.प. प्रशासक आकोटकार ठेकेदारांचे तारणहार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

खामगाव-गणेश भेरडे- खामगाव नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता असताना व मुख्याधिकारी मनोहरराव आकोटकार असताना कारभार कशाप्रकारे चालविल्या गेला हे सर्वश्रृत आहे. तर 3 जानेवारी 2022 रोजी सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर शहरवासियांच्या दुर्दैवाने मुख्याधिकारी आकोटकार प्रशासक म्हणून विराजमान झाल्याने जनतेला विविध समस्येचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने आकोटकार हे ठेकेदारांचे तारणहार असल्याचे मत यापूर्वीच वृत्ताच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट केलेले आहे.

आता तर प्रशासक म्हणून तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आल्याने पुर्वीचीच भूमिका ते अधिक कर्तव्यदक्षपणाने बजावत असल्याचे काही बाबींवरून समोर आले आहे. असे असतांनाच अंबिकानगर वासियांनी आज 30 मार्च रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक आकोटकार यांना दिलेल्या निवेदनावरून या बाबीला दुजोरा मिळत आहे.

घाटपुरी नाका भागातील अंबिकानगर मधील रहिवासी प्रभाकर रामदास मोरे व इतर नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार प्रभाकर मोरे यांच्या घरापासून घाटपुरी नाक्यापर्यंत नाली बांधकाम झालेले आहे. या दरम्यान भव्य वास्तूचे बांधकाम होत असल्याने संबंधितांनी मागील एक महिन्यापासून सदर नाली तोडून बंद केलेली आहे.

त्यामुळे मोरे व इतरांच्या घरातील सांडपाण्याची विल्हेवाट होत नसल्यामुळे सांडपाण्याचे डबके साचून दुर्गंधी पसरली आहे. तर मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी  याबाबत त्वरित कार्यवाही करून समस्यामुक्त करावे अशी विनंतीवजा मागणी निवेदनात केली आहे.

पण प्रशासक ठेकेदारांचे तारणहार असल्यामुळे या निवेदनाची दखल घेण्यात येईल की नाही. याबाबत शंकाच वाटते. कारण काही दिवसापूर्वी गांधी ले-आऊटमधील हनुमान मंदिराच्या वॉल कंपाउंडचे बांधकामासाठी ठेकेदाराने वृक्षतोड करून विल्हेवाट लावली. त्याने वृक्षतोडीची परवानगी घेतली किवा नाही हे न.प. वृक्ष अधिकारी देशमुख व प्रशासक आकोटकार यांनाच माहित, पण नागरिक ओरड करीत आहे.

तसेच सध्या वॉल कंपाऊंडचे बांधकाम सुध्दा निकृष्ट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र काय कोण जाणे तक्रार करण्यास कोणीही धजावत नाही, असो एकंदरीत नगर परिषदेचा कारभार बघितला तर उद्यान देखभाल दुरूस्तीचा ठेका एकाच कुटुंबाकडे मागील अनेक वर्षापासून वारसा हक्काने सुरू असल्याचे बोलले जात आहे.

उन्हाळा सुरू झाला असताना शहरातील कित्येक हापशी बंद आहेत. नागरिकांच्या समस्येबाबत लिहावे तेवढे थोडेच, आता तर न.प. अधिकाऱ्यांच्या ताब्यात गेल्याने लोकप्रतिनिधींना सांगण्याची नागरिकांना सोय उरली नाही. जो तो आपली तुंबडी भरण्याच्या नादात नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. एवढे मात्र खरे.

Leave A Reply

Your email address will not be published.