दररोज किमान एक चांगले कार्य आपल्या हातून व्हावे हाच संकल्प – अनिल नावंदर

0

 

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दररोज आपल्या हातून एक तरी चांगले कार्य झाले पाहिजे, जेणेकरून त्या चांगल्या कार्यामुळे रात्री झोप लागली पाहिजे. हाच माझा माझ्या वाढदिवसानिमित्त संकल्प आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव अनिल नावंदर यांनी काल आपल्या वाढदिवसानिमित्त केले.

दैनिक लोकशाही जळगावच्या वतीने अनिल नावंदर यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त विशेषांक प्रकाशित करण्यात आला. त्या विशेष अंकाचे प्रकाशन प्रसंगी अनिल नावंदर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दैनिक लोकशाहीच्या वतीने संचालक राजेश यावलकर, सल्लागार संपादक धों. ज. गुरव, महाव्यवस्थापक सुभाष गोळेसर आणि दैनिक लोकशाहीचे खामगाव प्रतिनिधी गणेश भेरडे यांनी नावंदर यांचे निवासस्थानी अनिल नावंदर व त्यांच्या धर्मपत्नी भारती नावंदर यांचा सत्कार केला. वाढदिवस विशेषांक प्रकाशन आणि सत्कार प्रसंगी महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य राजेंद्र नहार, जिल्हाध्यक्ष रामचंद्र अहिलाणी, जगदीश नावंदर, धर्मेश शहा, अजय जैन, अकिलोदिन, नंदकिशोर कांडेकर, नरेश नागवाणी, सुरेश खारकर आदी उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त अनिल नावंदर यांनी हार, पुष्पगुच्छ, पेढे अथवा भेटवस्तू, शाल, श्रीफळ ऐवजी निराधारांना देण्यासाठी किराणा वस्तू आणाव्यात, असे आवाहन केले होते. त्यामुळे त्या मोबदल्यात मिळालेल्या किराणा वस्तू अनिल नावंदर यांनी येथील निराधार केंद्रातील निराधार यांची भेट घेऊन त्यांना किराणा वस्तू दिल्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर अन्नदान, बुलढाणा येथे रक्तदान, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असे जिल्हाभरात समाज उपयोगी कार्यक्रम पार पडले. अनिल नावंदर यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच, दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.